सोलापूर, दि.22 : ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या या 11 जलरथांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, भारतीय जैन संघटना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य केतनभाई शहा , राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभुते ,जिल्हाध्यक्ष देशभूषण व्हसाळे, जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने , हद्दवाढ अध्यक्ष अशोक भालेराव ,ओम पाटील, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , संवाद सल्लागार सचिन सोनवणे , जलरथाचे जिल्हा समन्वयक साक्षांत वाघमारे यांच्यासह सर्व तालुका समन्वयक उपस्थित होते.
ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढावा यासाठी सर्व तालुक्यातील गावांमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जलरथाच्या सनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव तसेच सर्व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी हे काम पाहणार आहेत. सदर जलरथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स, गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांना पॉम्पलेट दिले जाणार आहेत तसेच नियुक्त केलेल्या समन्वयकांमार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल. गावातील ग्रामस्थांनी जलरथाच्या माध्यमातून योजनाची माहिती घेऊन गावातील पाण्याचे स्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी नोंदविण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.