सोलापूर, दि.22: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षकांना येणारे अडचणी लक्षात घेऊन निवडणूक कामकाजाचे नियोजन करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे करण्यात आली आहे.
जनगणना व निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक बांधवानी सदरहू कार्यासाठी निस्पृह व निरपेक्ष वृत्तीने नेहमीच योगदान दिलेले आहे. अलीकडच्या काळात बी. एल. ओ. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने करण्यात आलेले कुटुंब सर्वेक्षण प्राथमिक शिक्षकांनी नुकतेच यशस्वीपणे पूर्ण केले आहे. वास्तविक निवडणुकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते ही बाब नाकारता येत नाही, तरीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करताना प्राथमिक शिक्षक बांधवांच्या मागण्यांचा विचार सहानुभूती करावा अशी शिक्षकांची मागणी आहे.
शिक्षकांच्या मागणीचा विचार करून प्राथमिक शिक्षकांना निवडणूक निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात येऊ नये, वयाची त्रेपन्न वर्षे झालेल्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून वगळण्यात यावे, दुर्धर आजार असलेल्या बांधवांना निवडणूक कर्तव्यातून सवलत मिळावी, विविध आस्थापनेवरील पुरुष कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यासाठी ड्युटी दिल्यास जिल्ह्यातील महिला शिक्षक भगिनींना निवडणूक कर्तव्यातून वगळणे शक्य होईल त्याच दृष्टीने सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात यावे, बी.एल.ओ. म्हणून कार्यरत शिक्षक बांधवांना निवडणूक कर्तव्य देण्यात येऊ नये, ज्या तालुक्यातील बी. एल. ओ. म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांचे मानधन जमा झाले नाही ते तात्काळ जमा करण्याचे आदेश द्यावेत, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने नुकतेच मराठा सर्वेक्षण करण्यात आले हे कर्तव्य बजावणाऱ्या प्रगणकांना त्यांचे मानधन अदा करण्यात यावे या सर्व मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने आवाज उठविण्यात आलेला आहे.
या मागण्यांबाबत उपजिल्हाधिकारी निवडणूक शाखा गणेश निराळी यांना निवडणूक शाखेत निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनातील सर्व मुद्द्यांवर निवडणूक विभागातील कार्यभार सांभाळणाऱ्या तहसिलदार श्रीमती अर्चना निकम यांच्याशी चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार , जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर , मो.बा.शेख , राजन ढवण , श्रीशैल हडलगी यांनी प्रत्येक मुद्द्यांवर शिक्षकांच्या भावना श्रीमती अर्चना निकम यांच्यापुढे मांडल्या . यावेळी त्यांनी निवडणूक आदेश साॕफ्टवेअर द्वारे रँडम पद्धतीने येतात. यासाठी आवश्यक कर्मचारी संख्येच्या प्रमाणात 178 % एवढया कर्मचाऱ्यांना आदेश दिले जातात सद्या 148% माहिती संकलित झाल्याचे नमूद केले. शिक्षक समितीच्या सर्व मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून यापुढेही शिक्षक समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले.