मंगळवेढा, दि.21: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात येतय असलेल्या बारावीच्या परीक्षेस आज पासून शांततेत सुरुवात झाली. मंगळवेढा तालुक्यात नोंदणी करण्यात आलेल्या तीन हजार दहा विद्यार्थ्यापैकी 2937 विद्यार्थ्यांनी आज इंग्रजीचा पेपर दिला. तालुक्यातील विविध केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
बारावीच्या परीक्षेत आज पासून सुरुवात झाली असून परीक्षा आज 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहेत. मंगळवेढा तालुक्यात बारावी परीक्षेसाठी तीन हजार दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आज इंग्रजीचा पेपर होता. या पेपर साठी तालुक्यातून 3010 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 2937 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
मंगळवेढा तालुक्यात इंग्लिश स्कूल मंगळवेढा, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, बालाजीनगर, माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज येड्राव – खवे, एम.पी. मानसिंगका हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सोड्डी, श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, अरळी या सात परीक्षा केंद्रावर परीक्षेत सुरुवात झाली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
बारावी परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले असून आज इंग्रजीच्या पेपर कालावधीत ठिकठिकाणी भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे चालू असल्याचे आढळून आले. परीक्षा कालावधीत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथकाकडून वेळोवेळी परीक्षा केंद्रावर भेटी होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आजची उपस्थिती
मंगळवेढा तालुक्यात बारावी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका शिक्षण विस्तारअधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे, प्रकाश साळुंखे, विनायक खांडेकर, हरी लोखंडे, केंद्रसंचालक रवी काशीद, राजेंद्र गायकवाड, गणपती पवार, भारत पाटील, बसवराज कोरे, नंदकुमार व्हरे, श्री.एन. डी.बिराजदार यांच्यासह रनर तसेच सर्व परीक्षा केंद्रावर काम करणारे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.