श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ, झेप संवाद न्यूज
मंगळवेढा, दि. १९ : दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षा काळात प्रशासनाच्या वतीने परीक्षा काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून योग्य त्या खबरदाऱ्या घेण्यात आल्या. प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याने काही पालक व विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. परीक्षा काळातील या चिंतेच्या वातावरणाचा सारासार विचार केला तर असे दिसून येते की या सर्व प्रकारास बऱ्याच अंशी पालक वर्गच जबाबदार असल्याचे दिसून येते. शिक्षणाप्रती असलेल्या उदासीनतेमुळे पाल्यास अडचणीस सामोरे जावे लागते हे ध्यानी घेऊन पालकवर्गाने आपल्या पाल्याच्या वर्षभराच्या नियोजनावर योग्य ते लक्ष ठेवल्यास त्यांचा पाल्य निश्चितच यशाची गुढी उभारू शकतो. पाल्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांमध्ये जागरुकतेची गरज निर्माण झाली आहे.
यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या व भविष्यातही या उपायोजनाची अधिक कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहे. यावर्षी परीक्षा काळात प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, विविध भरारी पथके, भविष्यात आवश्यक असेल तेव्हा सीसीटीव्हीचे फुटेजची मागणी या बाबी करण्यात आल्या तसेच परीक्षा काळात काही ठिकाणी कॉपीचे प्रकार आढळल्यास या ठिकाणी अत्यंत कडक स्वरूपाची कारवाई करण्यात आली. पूर्वीच्या काळापासून कॉपी चे प्रकार चालत होते परंतु अलीकडच्या काळात मात्र या वैयक्तिक कॉपी तून या कॉपी प्रकाराने सामूहिक कॉपी असे उग्ररूप धारण केले. सामूहिक कॉपी प्रकाराला फक्त विद्यार्थी वर्गच जवाबदार नाही तर त्याला इतर अनेक घटकही कारणीभूत ठरत आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रशासनाकडून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी पाऊले उचलली जाणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गाने जागरूक राहणे आवश्यक आहे.
परीक्षा काळात वैयक्तिक किंवा सामूहिक कॉपी करून भविष्यात अंधार निर्माण करणारे मोजकेच विद्यार्थी असले तरी या मोजक्याच विद्यार्थ्यांच्या पालकांनी येत्या शैक्षणिक वर्षात अधिक दक्ष राहून पाल्याच्या प्रगती बाबत खालील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
1. प्रथमतः कॉपी शिवाय पाल्य अधिक गुण मिळवू शकत नाही किंवा पास होऊ शकत नाही ही मनातील कल्पना पहिल्यांदा बाजूला करा.
2. आपला पाल्य नियमित शाळेत जातो का हे पाहणे आवश्यक आहे. जर पाल्य शाळेत नेहमीच जात नसेल तर त्याला नियमित शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करणे.
3. तो ज्या शाळेत जातो तेथे वेळापत्रकाप्रमाणे नियमित अध्यापन केले का? याबाबत वारंवार खात्री करून घ्यावे.
4. पाल्याच्या गुणवत्तेची वेळोवेळी परीक्षा घेऊन त्याची चाचणी केली जाते का ?
5. पाल्याच्या वेळोवेळी वर्षभर परीक्षा झाल्यानंतर त्याचे गुण आपणास ताबडतोब माहित होतात का?
6. पाल्याच्या शैक्षणिक प्रगती बाबत तसेच इतर शालेय उपक्रमाबाबत किमान महिन्यातून एकदा तरी पालक सभा आयोजित केली जाते का?
7. आपला पाल्य अप्रगत असेल तर त्याच्यासाठी ज्यादा तासाची सोय शाळेकडून करण्यात आली आहे काय मग तो पाल्य पहिलीचा असो की बारावीचा. तसेच पाल्य प्रगत असो की अप्रगत त्याच्यासाठी जे विषय कठीण आहेत त्याची तयारीही जादा तास घेऊन केली जाते का?
8. आपला पाल्य जर मध्यम पातळीवरील गुण प्राप्त करीत असेल तर त्याला अधिकतम गुण मिळवण्यासाठी त्याने कोणते प्रयत्न केले पाहिजेत यासाठी शाळा कोणते प्रयत्न करत आहे याची माहिती घेणे व आपण स्वतःही त्याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे.
9. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने शालेय परीक्षा शिवाय शाळेत इतर सहशालेय परीक्षांची तयारी कशाप्रकारे केली जाते याबाबत माहिती घेणे. अशा सहशालेय परीक्षांची तयारी शाळेत तयारी योग्य प्रकारे होत नसेल तर शाळा प्रमुखास भेटून याबाबत आपले स्पष्ट असे मत व्यक्त करणे.
10. विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात या सर्व योजना आपला पाल्य ज्या शाळेत शिकत आहे तेथे राबवल्या जातात का याची माहिती घेणे.
11. आपल्या पाल्यास नियमितपणे दैनंदिन अभ्यास दिला जातो का? दिलेला अभ्यास तो घरी आल्यानंतर पूर्ण करतो का? पूर्ण केलेला अभ्यास दुसऱ्या दिवशी शाळेत तपासला जातो का याबाबत बारकाईने लक्ष देणे.
याबाबत पालक वर्गाने शैक्षणिक वर्षात दक्ष राहिल्यास पालक व पाल्याच्या मनात कोणतेही परीक्षा विषयी भीती राहणार नाही व पाल्य निश्चितच भविष्यात यशाची गुढी उभारेल. नवा संकल्प, नवी झेप, शैक्षणिक यशाची गुढी उंचच राहू दे याच झेप संवाद न्यूजच्या सर्वांना शुभेच्छा.









