दिव्यांग व दुर्धर आजारी शिक्षकांची फेर वैद्यकीय तपासणीचे आदेश ; उद्या होणारे धरणे आंदोलन स्थगित 

सोलापूर, दि. २१ :सन २०२५ मध्ये होणाऱ्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेत संवर्ग एकमधून अर्ज दाखल करणाऱ्या दिव्यांग व दुर्धर आजारी शिक्षकांना जे. जे. हास्पिटल मुंबई येथून फेर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी लागणार आहे. याबाबतीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने स्पष्ट आदेश काढण्यात आल्याने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती बार्शी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक संजय पाटील यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात विशेषतः बार्शी तालुक्यातील अनेक शिक्षकांनी शासनाचे बदली धोरण डोळ्यासमोर ठेवून सोयीच्या शाळेवर बदली व नियुक्ती मिळावी या हेतूने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवलेली आहेत. बार्शी तालुक्यातील एकूण 571 शिक्षकांपैकी 85 जणांकडे अशी प्रमाणपत्रे आहेत तर उच्च शिक्षण घेणाऱ्या काही पाल्यांना मतिमंद असल्याचे दाखवून काहीजण बदली धोरणातील सवलतींचा लाभ घेत आहेत. अनेक तालुक्यांत देखील काही अंशी हे प्रमाण दिसून येते.

संवर्ग एक मधून बदलीसाठी माहिती सादर केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या केवळ वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी न करता जे. जे. रुग्णालय , मुंबई येथे फेर वैद्यकीय तपासणी करण्यात यावी व तेथून प्राप्त झालेल्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधार बोगस वैद्यकीय दाखले जोडलेल्या कर्मचाऱ्यांना यातून बाजूला करण्यात यावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. 22/04/2025 रोजी दु. 2 ते 5 या वेळेत धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. याबाबतीत शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने वस्तुस्थिती विशद केली होती.

सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेला हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी संवर्ग एक मधील सवलतीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांना फेर वैद्यकीय तपासणी करुन घेण्याचे आदेश दिले असून चूकीची माहिती सादर करणार्या शिक्षकांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे बोगसगिरीला आळा बसणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सजगता दाखवून याबाबतीत धोरण स्पष्ट केल्याने उद्या मंगळवारी होणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता ज्यांनी संवर्ग एक मधून लाभासाठी अर्ज दाखल केले आहेत अथवा बदलीसाठी नकार दिला आहे अशांची यादी संकलित करुन जे.जे. हास्पिटल मुंबई येथून संबंधितांकडून फेर वैद्यकीय तपासणी होईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहील अशी भूमिका समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आल्याचे अनिल काळे, श्रीकृष्ण मुळे , धनाजी कुंभार, दिपक काळे , सुरेश व्हळे , अशोक लोहार, दत्तात्रय पाटील, विष्णू मिरगणे, उत्तम ओहोळ यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here