शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक समितीने वेधले लक्ष ; जिल्हा परिषद प्रशासनाशी विविध विषयावर चर्चा 

सोलापूर, दि. १७ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापक पदोन्नती, समानीकरण, जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेतील संभ्रम, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे अशा विविध प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांना निवेदन देऊन सुमारे तासभर विविध विषयांवर समक्ष भेट घेऊन चर्चा केली. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरु व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेमध्ये मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबवताना दि.३१ में २०२५ रोजी रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घ्यावीत, जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेतील निकालामध्ये आढळून आलेल्या चूकांची दुरुस्ती व्हावी व बक्षिसांची संख्या वाढवावी, संपूर्ण जिल्ह्यात समानीकरणासाठी एकच धोरण निश्चित करावे, दिव्यांग व दुर्धर आजार प्रमाणपत्रे सादर केलेल्या शिक्षकांची फेर वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना सुलभता यावी यासाठी जिल्हा स्तरावर मदत कक्ष उभारण्यात यावा, अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके अदा करावीत , सर्व विषय शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, पदवीधर शिक्षकांतून पदोन्नती धारण केलेल्या शिक्षकांना वेतनवाढ लागू करावी इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत ज्येष्ठ नेते अनिल कादे, मो.बा. शेख, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, राजन ढवण, मंगळवेढा अध्यक्ष विठ्ठल ताटे, बार्शी अध्यक्ष संजय पाटील, दक्षिण सोलापूर अध्यक्ष शेखलाल शेख, दयानंद चव्हाण, माढा सरचिटणीस विनोद परिचारक, अन्वर मकानदार, सुदर्शन शेजाळ, हरीराम काळुंगे, आण्णासाहेब रायजादे, उम्मीद सय्यद, अमोल बोराळे, विष्णू मिरगणे, आवेश करकामकर , संतोष कांबळे , अविनाश भोसले, यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here