युवकांनी पुरोगामी विचारांची कास धरावी- सुरेश पवार

मंगळवेढा, दि. 11 : शिक्षणांसह अनेक सामाजिक सुधारणांचा पाया महाराष्ट्रात घातला गेला. न्याय , स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसाठी आणि शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी समाज सुधारकांनी आयुष्य वेचले . म्हणूनच महाराष्ट्राकडे पुरोगामी विचारांचे जनकत्व येते. गौरवशाली महाराष्ट्राचा हा वारसा जपण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी पुरोगामी विचारांची कास धरावी असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते तथा छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले.

मंगळवेढा येथील श्रीसंत दामाजी महाविद्यालयात म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित ‘ पुरोगामी महाराष्ट्राचा स्फूर्तीमंत्र : जोतिबा अन् भिमराव ‘ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी शिक्षण हे मूठभर वर्गाची मक्तेदारी झालेली असताना जातिभेद व लिंगभेद या अडथळ्यांची शर्यत पार करुन फुले दांपत्याने शिक्षणाचा प्रसार केला. सतीची चाल रोखणे , केशवपन प्रथा थांबविणे , विधवा विवाहाला चालना, बालहत्या प्रतिबंध , दलितांसाठी पाण्याचा हौद खुला करणे अशा अनेक सामाजिक सुधारणांचे जनकत्व म. फुले यांच्याकडे जाते. महात्मा गांधी यांच्या जन्माच्या अगोदर विविध रुढी, परंपरांना आव्हान देण्याचे धैर्य ज्योतीरावांनी दाखविले. म. फुले यांना गुरु मानून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले.

दोन्ही महापुरुषांच्या जीवन चरित्रातील अनेक दाखले देत पवार यांनी गोरगरीब व बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले. अनेक सामाजिक सुधारणांचे जनकत्व महाराष्ट्राकडे येते म्हणूनच पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून बिरुद आपण अभिमानाने मिरवतो. शाहू, फुले , आंबेडकर यांनी न्याय ,स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसाठी आयुष्य वेचले. समाज परिवर्तनाचे थांबू पाहणारे चक्र गतिमान करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, समतेचा ध्वज उंच फडकता राहील यासाठी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाच्या आरंभी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गायकवाड, प्रा. डॉ.नवनाथ जगताप हे होते. सूत्रसंचालन प्रा. राजकुमार पवार यांनी केले तर आभार प्रा. विनायक कलुबर्मे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here