मरवडे फेस्टिव्हलमुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात मरवडे गावच्या माणसांचा नावलौकिक : अनिल सावंत 

छत्रपती परिवाराच्यावतीने फेस्टिव्हलच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान

मरवडे, दि.१९ : छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित मरवडे फेस्टिव्हलमुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात मरवडे गावच्या माणसांचा नावलौकिक असलेला पहावयास मिळतो असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.

ते मरवडे (ता.मंगळवेढा) येथे छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हल २०२५ निमित्ताने आयोजित पत्रकार बांधवांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार समारंभ व वीरेंद्र केंजळे प्रस्तुत साज सातारा या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती ॲड नंदकुमार पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, मरवडे भूषण साहेबराव पवार, दामोदर घुले, माजी सरपंच दादासाहेब पवार, संयोजक सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. आपण झेप संवाद न्यूज या वेब पोर्टलवर सदरची बातमी वाचत आहात. मरवडे फेस्टिव्हल २०२५ च्या निमित्ताने आयोजित पत्रकारांच्या कृतज्ञतापूर्वक सत्कार समारंभ व वीरेंद्र केंजळे प्रस्तुत साज सातारा या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. सावंत पुढे म्हणाले, मी गेल्या सात-आठ वर्षापासून मरवडे फेस्टिव्हल निमित्ताने आयोजित कार्यक्रमांना मी हजेरी लावत आहे हे मी माझे भाग्य समजतो. या गावातून खूप शिकण्यासारखा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच गावांनी छत्रपती परिवाराचा आदर्श घ्यावा. आज सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकारांचा सत्कार समारंभ होत आहे, या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते की ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी पुढे आले पाहिजे.

यावेळी राहुल शहा यांनी मरवडे सारख्या छोट्याशा गावात असा उपक्रम राबवला जात आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मरवडे फेस्टिव्हलमुळे मरवडे गावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालेले आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड नंदकुमार पवार यांनी छत्रपती परिवाराच्या वतीने गेली २५ वर्ष राबवण्यात येत असलेले विविध उपक्रमाचे कौतुक करत या फेस्टिव्हलमुळेच साहित्यिक, कलावंत यांना सन्मानजनक ओळख मिळाली असल्याचे नमूद केले.

प्रास्ताविकात छत्रपती परिवाराचे संस्थापक तथा संयोजक सुरेश पवार यांनी सांगितले की, गेली २५ वर्षे मरवडे फेस्टिव्हल अविरत सुरू आहे. सातत्याने कलावंताना प्रेरणा देण्याचे व लोककलावंताना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात आले आहे. यानिमित्ताने मरवडे गावचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम पत्रकारांनी केले आहे त्यामुळे या समाजातील चांगुलपणा जपणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येत आहे.

मरवडे फेस्टिव्हल २०२५ यशस्वी करण्यासाठी छत्रपती परिवाराच्या सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले तर आभार संयोजक सुरेश पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here