मरवडे, दि.१८: कलावंतांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या रोप्यमहोत्सवी मरवडे फेस्टिव्हल २०२५ ची सुरुवात कलावंतांच्या भव्य शोभयात्रेने मोठ्या दिमाखात करण्यात आली. या शोभयात्रेने रसिकांची मने जिंकण्याबरोबरच महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्याचेही काम केले.
छत्रपती परिवाराच्या वतीने गेली 25 वर्ष मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. छत्रपती परिवाराचे संस्थापक तथा संयोजक सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या मरवडे फेस्टिव्हलचा डंका आता महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे. यंदा रौप्यमहोत्सवी मरवडे फेस्टिव्हलच्या प्रारंभी भव्य अशा शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो कलावंत व पारंपरिक वाद्य कलाकार सहभागी झाले होते. टाळांच्या तालावर धरलेला बाल वारकऱ्यांचा ठेका, राजस्थानी नृत्य, पिंगळा, शालेय विद्यार्थ्यांची शिवकालीन वेशभूषा, महिलांची वारकरी दिंडी त्याचबरोबर विजापूर येथील मोटू पतलू चे विविध मुखवट्यातील कलापथक या साऱ्यांनीच मरवडेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. तर या जोडीला असलेल्या हलगी पथक व बॅन्जो पथकाची सुरेल साथ असा हा मरवडे फेस्टिव्हलचा प्रारंभाचा सोहळा रसिकवर्गाने याची देही याची डोळा अनुभवला. सुरुवातीस मंगळवेढा तालुक्याचे सुपुत्र व बिहार राज्यात कार्यरत असलेले जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनी सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अर्पण केला.
आज मंगळवार दि. १८ मार्च रोजी सायं. ७ वा. छत्रपती परिवाराच्या विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देऊन मरवडे नगरीचा लौकिक सर्वदूर पोहचविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच विरेंद्र केंजळे प्रस्तुत ‘साज सातारा’ हा सुंदर कार्यक्रम संपन्न होणार आहे.बुधवार दि. १९ रोजी रात्री ८ वा. शिवशाहीर रंगराव पाटील व कला पथक (कोल्हापूर) प्रस्तुत ‘मुद्रा भद्राय राजते’ हे ऐतिहासिक पोवाडा नाट्य आयोजित करण्यात आले असून शिवचरित्रातील १६ प्रसंगांचे सादरीकरण केले जाईल.
गुरुवार दि. २० रोजी स. १० वाजता मरवडे फेस्टिव्हलचे खास आकर्षण असलेल्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यामध्ये काष्ठशिल्पकार राहुल लोंढे, अमित भोरकडे, राजू रायबान यांच्या सुंदर पेंटिंग्ज, फोटोग्राफीचा आनंद रसिकांना मिळणार आहे. शिवाय युगंधर आखाड्याच्या वतीने ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, तसेच माहेश्वरी कलादालन, यशवंत गाजूल, राकेश गायकवाड यांच्या दुर्मिळ वस्तूंचे देखील प्रदर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुंदर रांगोळी, मूर्तीकाम, मातीकाम, कागदकाम या देखील कलाकृती मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन शैक्षणिक सहलीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. याच दिवशी दु. १२ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, रंगभरण, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर संध्या. ८ वा. जयदीप डाकरे (भूदरगड) प्रस्तुत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा मराठी लोक परंपरेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दु. ३ वाजता जिल्हा स्तरीय शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये शाळा व शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर संध्या. ७ वाजता महाराष्ट्रातील नामवंत निमंत्रित नृत्य कलावंतांचा ‘नृत्य जल्लोष’ साजरा होईल.
या संपूर्ण सोहळ्याची सांगता शनिवार दि. २२ मार्च रोजी होणार असून सायं. ४ वाजता मंगळवेढा तालुक्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विविध क्षेत्रातील २५ मान्यवरांचा समाज गौरव पुरस्काराने विशेष सन्मान केला जाईल.तर संध्या. ७.३० वा. मरवडे फेस्टिव्हलच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या साहित्य, कला क्षेत्रातील राज्य स्तरीय पुरस्कारांचे वितरण तसेच मरवडे भूषण, श्रावणबाळ तसेच आदर्श माता या पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच निमंत्रित कवींच्या उपस्थितीत ‘काव्यसंध्या’ हा कार्यक्रम होणार असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजिवनी तडेगांवकर (जालना) या भूषविणार आहेत. यावेळी नारायण पुरी (छ. संभाजीनगर), केशवराव खटींग (परभणी), अरुण पवार (परळी), कु. गुंजन पाटील (जळगांव), श्रीनिवास मस्के (नांदेड), रोहित शिंगे (इचलकरंजी), रमजान मुल्ला (सांगली), शरीफ सय्यद (सोलापूर), इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते (मंगळवेढा) इत्यादी मान्यवर कवींची उपस्थिती लाभणार आहे.