मंगळवेढा, दि.१७ : महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2025 चे वेतन गुढीपाडवा व रमजान ईद सणापूर्वी अदा करण्याची महत्वाची मागणी माजी शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
याबाबत श्री. सावंत यांनी निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण असून हिंदु नववर्ष गुढीपाडव्याला सुरु होते. हा सण मोठ्या उत्साहाने देशात साजरा करणेत येतो. तसेच 31 मार्च 2025 रोजी रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. हा सण मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2025 चे वेतन गुढीपाडवा व रमजान ईद सणापूर्वी अदा केलेस कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या उत्साहाने सण साजरा करतील. तरी माहे मार्च 2025 चे वेतन गुढीपाडवा व रमजान ईद सणापूर्वी अदा करावेत.
तसेच याबाबत त्यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनाही निवेदन दिले आहे.
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे नेहमीच शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतात आता गुढीपाडवा व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पगाराबाबत मागणी करण्यात आल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवातून आनंद व्यक्त केला जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै २०२४ पासूनच वाढीव तीन टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असताना महाराष्ट्रात मात्र आठ महिने जाऊनही वाढीव तीन टक्के दराने महागाई भत्ता दिला जात नसल्याने माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते प्रसंगी आंदोलन करण्याची तयारीही केली होती. शासनाने श्री. सावंत यांच्या मागणीचा विचार करून तातडीने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के दराने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. आताही या मागणीचा विचार होऊन मार्च २०२५ चा पगार दि.३० मार्च २०२५ पूर्वी करण्याचा दिलासादायक निर्णय घ्यावा असा आशावाद कर्मचाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे.