मंगळवेढा, दि.११ : म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरणात दुजाभाव केला जात आहे मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून वितरिका क्रमांक १ मधून काही गावांना, वितरिका क्रमांक २ मधील बहुतांश गावांना आणि उमदी डी.वाय. मधील सर्व गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. उमदी डीवायमधील गावांना तर गेल्या दोन वर्षांपासून पाणी मिळालेले नाही. ही मंगळवेढा तालुक्यातील परिस्थिती असताना, शेजारील जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे. हा दुजाभाव का? मंगळवेढा तालुक्यावर नेहमीच दुजाभाव होत असून हे अन्यायकारक आहे. मंगळवेढा ‘टेल’ ला असल्याने हा अन्याय सहन करावा लागत आहे, अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पाणी वितरणाचे नियोजन करावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरण बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिला.
महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ अंतर्गत म्हैसाळ योजनेच्या वितरणाबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
मंगळवेढ्यासाठी १.२७ टीएमसी पाणी मंजूर असताना त्यातील केवळ ३७% पाणी दिले जाते. इतकं कमी पाणी का? असा प्रश्न उपस्थित करून मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पावरील लाभक्षेत्रातील गावात पाण्याची परिस्थिती बिकट होत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची आवश्यकता आहे. एकीकडे म्हैसाळ योजनेत गावे असल्याने प्रशासन टँकर देत नाही आणि दुसरीकडे म्हैसाळ योजनेतूनही पाणी येत नाही. त्यामुळे या गावातील लोकांनी करायचं तरी काय? हा प्रश्न आमदार अवताडे यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित करत अधिकाऱ्यांची बोलती बंद केली यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या परिस्थितीबाबत थेट अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडून पत्र व्यवहार करूनही अधिकारी प्रतिसाद देत नाही, ही बाबही आमदार आवताडे यांनी मंत्र्यांसमोर निदर्शनास आणली. तसेच मंगळवेढा तालुक्याबाबत असलेली अधिकाऱ्यांची मानसिकताही या बैठकीत निदर्शनास आणली. त्यावर या मानसिकतेत बदल करण्याच्या स्पष्ट सूचना आणि ताकीद राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. शिवाय स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवाय यापुढे पाणी वितरणाबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले
या बैठकीला क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे, आ.महेश लांडगे, आ. अमोल महाडिक, आ. शंकर जगताप आदी लोकप्रतिनिधी तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री अतुल अकोले, जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.