मरवडे, दि.२२ : मरवडे (ता मंगळवेढा) येथील कुलकर्णी परिवार आणि आप्तेष्ट यांनी सावित्री मंगल कार्यालय मरवडे येथे स्नेहमेळावा आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेला कुलकर्णी परिवार उपस्थित होता. या स्नेह मेळाव्यामुळे कुलकर्णी परिवारांच्यावतीने एकोपा या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
सर्व कुटुंब एकत्र आणुन, त्यांना त्यांच्या नातेसंबंधातील ओळख व्हावी. परस्परांमध्ये जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी वृध्दिंगत व्हावी हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेऊन या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.शनिवारी दुपारी ३ वाजता आलेल्या पाहुण्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.यात अबालवृद्धांची लेझिम, लाठी काठी आणि तलवार बाजीच्या प्रात्यक्षिकांसह सर्वाची मने मंत्रमुग्ध केली.
जाहिरात _
कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष पांडुरंग बापूजी कुलकर्णी गुरुजी यांनी कार्यकारणीच्या सदस्याचा सत्कार केला आणि आपल्या मनोगतातून मरवडेकरांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. चहापानानंतर कुटुंबातील सर्वासाठी टास्क चे आयोजन करून वेगळीच धमाल करण्यात आली. तर रात्रीच्या सत्रातील विविध कलागुणदर्शनात कराओकेची गाणी, रेकार्ड डान्स,रिमिक्स डान्स, भावगीते,भक्तिगीते,पोवाडा, भरतनाट्य,आणि जय मल्हार या दूरदर्शन मालिकेतील हुबेहुब व्यक्तिरेखा साकारत खंडोबाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.नंतर रात्रीच्या गावरान भोजनाचा परिवारांनी आस्वाद घेतला.
रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळ सत्रातील शाखेच्या आयोजनानी कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिवाराने योगप्रशिक्षणातून सूर्यनमस्कार,योगनिद्रा आणि झुंबा नृत्यप्रकारातून शारीरिक हालचालींनी महिलांना व्यायामाचे महत्व विषद केले. अल्पोपाहारानंतर मरवडेकर परिवाराच्या जुन्या आठवणीने शब्द बध्द केलेली,” एकोपा” या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासाठी, माजी शिक्षणाधिकारी श्री.डी.वाय.कुलकर्णी, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार, माजी शिक्षण आयुक्त सुरेश कुलकर्णी, पांडुरंग बापूजी कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, विद्याधरराव जोशी, गुंडोपंत कुंभारे, श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, संपादक राज कुलकर्णी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी परिवारातील महिलांनी आपल्या लघुउद्योगातून बनविलेले विविध खाद्यपदार्थ आणि हस्तकलेतून आकाराला आलेल्या वस्तूचे स्टाॅल लावण्यात आले.तर फनीगेम्स मुळे महिलांना एक वेगळाच आनंद घेता आला नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.तर शेवटच्या सत्रातील टास्कमुळे, विविध हिंदी मराठी गाण्यांच्या अंताक्षरीने परीवारांना वेगळाच आनंद घेता आला. कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक आणि आप्तेष्ट यांनी आपले मनोगत मांडत. मरवडेकराचा स्पेशल चहा घेत घेत या स्नेहमेळाव्याची गोडी जिभेवर रेंगाळणारी ठरली.
कुणी सेल्पी पाॅईंटवर आपली छबी काढण्यात मग्न होते.तर कुणी जुन्या वस्तू हाताळत होते. शेवटी सर्वांनी सामुहिक फोटोनी आपली आठवण संग्रहित केली. तर पसायदान आणि क्षमाप्रार्थनेनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या स्नेहमेळाव्याचा आदर्श इतर कुटुंबानी घेऊन, नव्या पिढीला एकत्र कुटुंबाची आणि नातेसंबंधाची खरी ओळख करुन देण्यासाठी हा पहिलाच स्नेहमेळावा मैलाचा दगड ठरणार आहे.
खूपच छान धन्यवाद
एकच नंबर शब्दांकन…. अन पत्रकार