मंगळवेढा, दि.२० : कलावंतांचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या मरवडे फेस्टिव्हलचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दि.१७ मार्च पासून सुरु होणाऱ्या यंदाच्या पंचविसाव्या मरवडे फेस्टिव्हलचा आरंभ कलावंत व कलावंतांच्या आविष्काराने नटलेल्या शोभायात्रेने होणार असल्याची माहिती छत्रपती परिवाराचे संस्थापक तथा मरवडे फेस्टिव्हलचे संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर कुस्तीच्या आखाड्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मरवडे गावची यात्रा प्रसिद्ध आहे. या गावयात्रेला जोडूनच छत्रपती परिवाराच्या वतीने सन २००० पासून मरवडे फेस्टिव्हल सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. कोरोना संकटकाळ वगळता दरवर्षी सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील चोवीस वर्षांत छत्रपती परिवाराने मरवडे फेस्टिव्हलमध्ये नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम राबविले आहेत. शालेय विद्यार्थी व नवयुवकांच्या कला गुणांना अविष्काराची संधी देतानाच महाराष्ट्राची गौरवशाली लोकपरंपरा जतन करणार्या कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले असून कलावंतांचे माहेरघर म्हणून मरवडे फेस्टिव्हलचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा व दिमाखदार सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांची रेलचेल असलेला सोहळा म्हणून मरवडे फेस्टिव्हलकडे पाहिले जाते.यामध्ये प्रामुख्याने कवी संमेलने , नाटके , एकांकिका, एकपात्री प्रयोग, रेकॉर्ड डान्स, संगीत मैफिल, लोककला महोत्सव, जादूचे प्रयोग, हिपनाटीझम , कथा महोत्सव, हास्य दरबार, सप्त खंजिरी वादनाद्वारे प्रबोधनाचे कार्यक्रम , शाहिरी , गोंधळ गीत, लोकगीतांचे पारंपारिक कार्यक्रम अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करुन संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रकारच्या कलावंतांना कला सादरीकरणाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय दरवर्षी साहित्यिक व कलावंतांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते.
सपूर्ण महाराष्ट्रातील कलावंतांसाठी कला पंढरीचे असाधारण महत्त्व मरवडे नगरीला प्राप्त झाले आहे. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मरवडे फेस्टिव्हलचा आरंभ कलावंत व लोककलावंतांच्या भव्य शोभायात्रेने दि. १७ मार्च रोजी दु. ३ वाजता होणार आहे. पारंपारिक कलाप्रकार , पारंपारिक वेशभूषा , वाद्यांसह सहभागी होणाऱ्या कलाकार व कलापथकांना सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा, शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात येणार असून प्रवास खर्चाची तरतूद करण्यात आली असून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे . तरी या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7057475610,9421067107,9764525281 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने रावसाहेब सुर्यवंशी, शशिकांत घाडगे, नवनाथ जाधव, सिद्धेश्वर रोंगे, देविदास चौधरी , रावसाहेब जाधव, ज्ञानेश्वर कुंभार, अरुण सरडे, विजय पवार, दत्तात्रय मासाळ यांनी केले आहे.