सांगोला, दि. 10 : राज्यातील गोरगरीब व बहुजन समाजातील वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे मात्र मोफत व सक्तीचे शिक्षण हा बालकांचा हक्क असून तो अबाधित ठेवण्यासाठी विधीमंडळात आवाज उठविला जाईल. प्रसंगी त्यासाठी समाजाला सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याची ग्वाही आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह , सांगोला येथे तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन थाटात संपन्न झाले. या अधिवेशनाचे उदघाटन आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे हे होते. यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत शिक्षण व आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वंचित घटकांना न्याय देण्यासाठी शासनाने यासाठी अधिक तरतूद केली पाहिजे. या दोन्ही विभागातील सर्व रिक्त पदे भरली गेली पाहिजेत त्याशिवाय अपेक्षित दर्जावाढीची अपेक्षा ठेवता येणार नाही , त्यादृष्टीने पाठपुरावा केला जाईल असा निर्वाळा दिला. शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे यांनी राज्य स्तरावरील प्रश्नांचा ऊहापोह केला.
यावेळी व्यासपीठावर शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर, अनिलबापू कादे , राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, राज्य संघटक प्रतापराव काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बंडगर, विशाल कणसे, सांगली बँकेचे माजी चेअरमन यु.टी.जाधव , शशिकांत बजबळे, माजी राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, विस्ताराधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम बनसोडे, जिल्हा सल्लागार सुरेश ढोले , जिल्हा संघटक गजानन लिगाडे, पंढरपूर विभागीय अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी,शिक्षक नेते राजन ढवण, भारत कुलकर्णी, माढा तालुक्याचे अध्यक्ष कैलास काशीद, विभागीय अध्यक्ष दिनकर शिंदे, मोहोळ शाखेचे अध्यक्ष चरण शेळके, माळशिरस शाखेचे अध्यक्ष रमेश सरक , पंढरपूर शाखेचे सरचिटणीस सुनील अडगळे, मंगळवेढा तालुका सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत पवार , शिक्षक नेत्या श्रीमती नयन पाटील, सुजाता देशमुख, शहनाज आतार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या निमित्ताने शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख डॉ. रंगनाथ काकडे यांचे ‘ गुरु हा संतकुळीचा राजा ‘ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी राज्य व जिल्हा स्तरावर शिक्षक समितीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध विषयावर भूमिका मांडली. ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर , माजी सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसंदर्भात ठामपणे आपली भूमिका मांडली. तर डॉ अनिकेत देशमुख यांनी तालुका स्तरावरील शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्वाळा दिला.यावेळी प्रास्ताविक मावळते अध्यक्ष भारत लवटे यांनी केले. यावेळी शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सूत्रसंचालन तालुका सोसायटीचे चेअरमन संतोष कांबळे, तुकाराम वाघमोडे यांनी केले. शेवटी आभार भागवत भाटेकर यांनी मानले . यावेळी तालुक्यातील शिक्षक बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.