मंगळवेढा, दि.19: मंगळवेढा तालुक्यातील बस स्थानकाचे दुरावस्था झाल्याचे दिसून येत असून बसस्थानकासमोरील परिसर काँक्रिटीकरण करणे नवीन बसेसची मागणी करणे जुन्या बसेसची व्यवस्थित दुरुस्ती करणे अशा बसस्थानकातील अडचणी मला अद्याप का सांगितल्या नाहीत असा सवाल आगार प्रमुखाला करत तात्काळ बस स्थानकातील दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून द्या असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा बस स्थानकाचे आगार प्रमुख संजय भोसले यांना दिला.
आमदार समाधान आवताडे यांनी आज सोमवारी सकाळी मंगळवेढा बस स्थानकाला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली. मंगळवेढा आगाराकडे सध्या 64 बसेस असून 26 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाले आहेत त्याचाही त्यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर शैक्षणिक सहलीसाठी चांगल्या गाड्यांची मागणी का केली नाही? सहलीला खराब गाड्या देऊन विद्यार्थ्यांना त्रास झाल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी माझ्याकडे केल्या आहेत हा प्रकार पुन्हा घडता कामा नये, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ही वारंवार ना दुरुस्त होत आहेत त्याकडेही लक्ष देऊन चांगल्या गाड्या मागवून घ्या, बस स्थानकावर आल्यानंतर लोकांना बस स्थानक स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे, यासाठी आगार प्रमुखांनी लक्ष द्यावे बस स्थानकाच्या आवारात बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करा प्रवाशांना चांगल्या सुविधा द्या, प्रवासाची कोणतेही तक्रार माझ्याकडे येता कामा नये, बस स्थानकाच्या सुविधेसाठी मागेल तेवढा निधी मी मंजूर करून देतो पण ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टींची मागणी करा असे आवाहन आगार व्यवस्थापनाला करत मंगळवेढा बस स्थानक हे स्वच्छ व सुंदर बस स्थानक बनले पाहिजे अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या.