मंगळवेढा, दि.४ : मरवडे (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथील छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मरवडे फेस्टिव्हल सोहळ्याचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या सोहळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही साहित्यिक व कलावंतांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होऊ ईच्छिणाऱ्या कला व साहित्यप्रेमींनी २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले आहे.
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर मरवडे येथे संपन्न होणाऱ्या गाव यात्रेला जोडूनच मागील २४ वर्षांपासून मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदा १७ मार्चपासून रौप्यमहोत्सवी सोहळ्याला आरंभ होणार असून या कार्यक्रमात भरगच्च सांस्कृतिक, साहित्यिक व कलाविष्काराचे उपक्रम राबविले जाणार आहेत. या सोहळ्यात स्व. मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्य गौरव पुरस्काराने साहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये एकंदर साहित्य सेवेसाठी एका साहित्यिकाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन तर मागील दोन वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दोन साहित्यिकांना पुरस्काराने गौरविण्यात येईल.
याशिवाय कला व लोककलेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या दोन कलावंतांचा स्व. भागवतराव रामचंद्र पवार कला व लोककला गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा , शाल , बुके असे या पुरस्कारांचे स्वरुप राहील. या पुरस्कार योजनेत सहभागी होऊ ईच्छिणाऱ्यांनी आपले प्रस्ताव श्री सुरेश दाजी पवार मु पो. मरवडे ता. मंगळवेढा, जि. सोलापूर पिन – 413319 या पत्त्यावर पाठवावेत व अधिक माहितीसाठी 7057475610 / 9421067107 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन रावसाहेब सुर्यवंशी, ज्ञानेश्वर कुंभार, शशिकांत घाडगे, सिद्धेश्वर रोंगे , नवनाथ जाधव, अरुण सरडे, रावसाहेब जाधव यांनी केले आहे.