मंगळवेढा, दि. ०३ : मुख्यालय वास्तव्याची अट, एम.एस.सी.आय.टी मुदतवाढ, अशैक्षणिक कामे, संचमान्यता निकष, खर्डेघाशी साहित्यांचा तगादा अशा विविध प्रश्नांसंदर्भात राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मनात अस्वस्थता आहे. हे प्रश्न शिक्षक समितीच्या व्यासपीठावरुन सातत्याने मांडले जात आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर शिक्षक समितीची वकिली करणार असून त्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री तथा उदगीर तालुक्याचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संपर्कप्रमुख किसनराव बिरादार यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ. बनसोडे यांनी समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोठे असून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रभाव टाकणाऱ्या बाबी झाल्या पाहिजेत व शिक्षकांना चिंतामुक्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही व्हावी यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गोविंदराव केंद्रे, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य एडीटर पंडीतराव नागरगोजे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, लातूर जिल्हाध्यक्ष अरुण सोळंके, जालना जिल्हाध्यक्ष मधुकर काकडे, परभणी जिल्हाध्यक्ष सिरसाट, वसंत घोगरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी किसनराव बिरादार यांच्या संघटनात्मक तसेच शैक्षणिक कार्याचा गौरव करतानाच राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांचे बाबतीत ऊहापोह केला. यावेळी प्रास्ताविक माधवराव फावडे यांनी केले सूत्रसंचालन तालुका नेते रमेश जाधव यांनी केले तर आभार पंडित हुरुसनाळे यांनी मानले. यावेळी लातूर जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.