मंगळवेढा, दि.29 : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अनुदान गेले काही महिने मिळत नसल्याने लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील लाभार्थ्यांनी मंगळवेढा तहसील कार्यालयात ठिय्या मांडत तातडीने अनुदान देण्याची मागणी प्रभारी महसूल तहसीलदार सुरेखा हजारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंगळवेढा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे जवळपास साडेपाचशे लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नाही. हे अनुदान मिळण्यासाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. या योजनांचे अनुदान ज्या बँक खात्यात जमा होते त्याठिकाणी सबंधित बँकेला वारंवार हयात दाखला दिला तरी महसूल विभागाकडूनही उत्पन्न दाखला, हयात दाखला मागणी करण्यात येते. हे दाखले देवूनही अनुदान वेळेवर मिळत नसल्याची तक्रार लाभार्थीकडून करण्यात येत आहे. यामुळे लक्ष्मी दहिवडी येथील लाभार्थीना तहसील कार्यालयात एकत्र येत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता होऊनही बॅक, शासकीय कार्यालय असे हेलपाटे मारावे लागत असल्याने आम्हाला केव्हा न्याय मिळणार अशी अर्त हाक देत वेळेवर अनुदान देण्याचा मागणी यावेळी करण्यात आली. सर्व शासकीय योजनाच्या लाभार्थींना तातडीने लाभ देण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने येताळा भगत व सामजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कौंडूभैरी, गंगाधर मसरे, संतोष माने व लाभार्थी यांनी यावेळी दिला आहे.