पंढरपूर, दि. 24 : राज्यातील शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेले विविध प्रश्न तसेच प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झालेबद्दल तमाम प्राथमिक शिक्षक बांधवांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान केला. याशिवाय शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेल्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शिक्षणाची परिपूर्ण माहिती असलेल्या नेतृत्वाकडे ग्रामविकास मंत्री पदाची धुरा आल्याने शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रश्नांची सोडवणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी वास्तव्याची अट शिथिल करावी , राज्यातील प्राथमिक शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावी, राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना वीज व पाणी मोफत उपलब्ध करुन द्यावे , विद्यार्थ्यीनींना दिल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्त्यात वाढ करावी, प्राथमिक शिक्षकांकडे सोपविण्यात येणारी अशैक्षणिक कामे कमी करण्यात यावीत ,राज्यात सर्वत्र गुणवत्ता वाढीसाठी एकच एक कार्यक्रम राबविण्यात यावा , राज्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, 15 मार्च 2024 चा संचमान्यता शासन निर्णय मागे घेण्यात यावा, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण करुन शिक्षकांची रिक्त पदे भरावीत,शैक्षणिक कामकाज प्रभावित करणारी Portal /App’s मर्यादित असावीत इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी नामदार गोरे यांनी संघटनेकडून मांडण्यात आलेले प्रश्न समजून घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी स्वतंत्र वेळ देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बंडगर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, पंढरपूर शाखेचे सरचिटणीस सुनील अडगळे,गुंडीबा कांबळे, विजय पवार इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.