मोहोळ, दि.18 : मोहोळ येथील नेताजी प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी हितगुज मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी हितगुज मेळाव्याला ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकेच्या संपादिका डॉ. गीताली विनायक मंदाकिनी व ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.स्मिता प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी हितगुज मेळाव्याच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ.स्मिता प्रमोद पाटील यांचे नेताजी प्रशाला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच आदर्श प्राध्यापिका श्रीमती सविता गादेकर यांनी गीताव्रती ही पदवी संपादन करून त्यामध्ये सुवर्णपदक पटकावल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य दत्तात्रय काशीद यांची महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित (2005 पूर्वी) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.
किशोरी मेळाव्यातून मुलींचे प्रबोधन केले जाते परंतु नेताजी प्रशालेने केवळ विद्यार्थिनी साठी नव्हे तर विद्यार्थी व विद्यार्थिनी या दोघांसाठी विद्यार्थी हितगुज मेळावा आयोजित करून या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना समाजामध्ये वावरत असताना कोण कोणत्या गोष्टींचे भान असावयास हवे तसेच चांगले वाईट गोष्टींचा अनुकरण कशा पद्धतीने केले पाहिजे हे करत असताना कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आदर कसा राखला पाहिजे यासह अनेक चांगल्या सवयी कशा जोपासता येतील. हे सांगताना डॉ. गीताली विनायक मंदाकिनी यांनी साने गुरुजींचा श्यामच्या आई या पुस्तकाचा दाखला देत सगळ्या विद्यार्थ्यांनी अनुकरण करायला हवे असे प्रतिपादन त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून कशा पद्धतीने दूर राहता येईल याचा विचार केला पाहिजे योग्य कामाव्यतिरिक्त मोबाईलचा वापर करूनही मोबाईलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक तेवर काय परिणाम होऊ शकतो यावर सविस्तर माहिती डॉ स्मिता पाटील यांनी त्यांच्या मनोगतात दिली. अध्यक्षीय मनोगतात सविता गादेकर यांनी भगवत गीतेतील श्लोकाचा अर्थ सांगून जीवनामध्ये वावरत असताना यशस्वी होण्याकरिता कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो हे सांगताना विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून न जाता त्याच्यातून मार्ग निघत असतो त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांनी आगेकूच करायला हवे हे विद्यार्थ्यांना पुराणातील उदाहरणासह समजावून सांगितले.
यावेळी नेताजी विद्या विकास मंडळाचे चेअरमन डॉ. एम.ए गायकवाड व अध्यक्ष डॉ. प्रमोद चंद्रसेन पाटील प्राचार्य दत्तात्रय काशीद, पर्यवेक्षिका शमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान आढवळकर व लक्ष्मण पाटील तर आभार श्री.कसबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.