मंगळवेढा, दि.18 : सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शाळा व शिक्षकांचा विविध शैक्षणिक पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कार योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा व शिक्षकांनी आपले प्रस्ताव २६ जानेवारी पूर्वी संस्थेकडे सादर करावेत असे आवाहन छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले आहे.
मरवडे येथील छत्रपती परिवार व स्व. आप्पा खंडू भगरे सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीने मागील २३ वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा व व शिक्षकांचा विविध शैक्षणिक पुरस्कारांनी गौरव केला जातो. यामध्ये शालेय अंतरंग, बाह्यांग, रंगरंगोटी, भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, सहशालेय उपक्रम, समाज सहभाग इत्यादी बाबी विचारात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा २००१ पासून” स्वच्छ शाळा, सुंदर शाळा ” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तर उत्कृष्ट वृक्ष लागवड व संवर्धन करणाऱ्या शाळांना “वृक्षमित्र शाळा ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
याशिवाय जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील योगदान देखील विचारात घेतले जाते. विशेषतः आजवर चांगले कार्य करुनही पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्या गुणी व होतकरु शिक्षकांचा प्राधान्याने विचार केला जातो.
छत्रपती परिवाराच्या लौकीकाला साजेसा भव्य व दिमाखदार सोहळा लवकरच मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . तरी पुरस्काराठी प्रस्ताव दाखल करु इच्छिणाऱ्या शाळा व शिक्षक बांधवांनी दि. 26 जानेवारी 2025 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन प्रा.बाळासाहेब भगरे,
रावसाहेब सुर्यवंशी , शशिकांत घाडगे, सिद्धेश्वर रोंगटे ,नवनाथ जाधव, अरुण सरडे, ज्ञानेश्वर कुंभार , रावसाहेब जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7057475610 , 8275884636 , 9764525281, 9421067107 , 7588019940 या क्रमांकावर संपर्क साधावा.