सिद्धापूर, दि.१२ : सिध्दापूर – वडापूर हा रस्ता सिध्दापूर हून सोलापूरला जाणारा महत्त्वाचा व जवळचा रस्ता म्हणून ओळखला जातो, या रस्त्याच्या कामाचे पूजन होऊन खुप दिवस झाले पण रस्त्याचे काम सुरू केले जात नाही. सिद्धापूर – वडापूर हा रस्ता प्रवाशासाठी जीवघेणा ठरत असून लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्त्याचे काम ताबडतोब मार्गी लावावे, अशी मागणी शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सिध्दाराम काकणकी यांनी केली आहे.
सिद्धापूर – वडापूर या रस्त्यावर पावसाळ्यात खड्डै असल्यामुळे पाणी साचते व साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेक लोकांचे अपघात झालेले आहेत., रस्त्यावर खुप मोठी वाहतूक असते, सिध्दापूर ते सोलापूरला जवळचा रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो त्यामुळे दिवस रात्र वाहतूक असते. शेतकऱ्यांसाठी सुध्दा हा महत्त्वाचा रस्ता आहे, ऊसतोड हंगामात याच रस्त्याने ऊस वाहतूक केली जाते. रस्त्यावर खुप मोठी खड्डे पडल्याने ऊसाचे ट्रालीसुध्दा जाणे मुश्किल झालेले आहेत, त्यामुळे हा रस्ता जीवघेणा झालेला आहे, चारचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने कसरत करीत चालवावी लागतात. रस्ता खराब झाल्यामुळे पाच ते दहा मिनिटात पार होणाऱ्या अंतरासाठी आता अर्धा ते पाऊण तास लागत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुचाकींचे टायर खराब होणे, स्पेअर पार्ट खराब होणे यासारख्या आर्थिक अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. सिध्दापूरमध्ये येथे श्री मातुर्लिंग यात्रा दरवर्षी भरत असते त्यामुळे अनेक भक्त श्री मातुर्लिगाच्या दर्शनासाठी व यात्रेला येत असतात, या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी दोन्ही तालुक्यात आपल्या विकास कामांचा सपाटा लावलेला आहे. त्यांनी सिद्धापूर वडापूर या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लक्ष देऊन या रस्त्याचे काम ताबडतोब मार्गी लावावे.
-सिध्दाराम सोमण्णा काकणकी,
युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष, शेतकरी सघटना