सोलापूर, दि.१२ : १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचायांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आमदार श्री सुभाष देशमुख यांना सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटना नेते तात्यासाहेब जाधव यांनी निवेदन देत शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ताबडतोब लागू करावी अशी मागणी करण्यात आली.
राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू झाली आहे. कर्नाटकमध्ये सुध्दा लवकरच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मागील ७ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे संघटनेच्या वतीने काढण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत अनेक कर्मचारी हिताचे निर्णय घेतले आहेत. याचपध्दतीने सध्याच्या काळातील कर्मचाऱ्यांचा सर्वात जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन असून या प्रश्नावर सरकारने तातडीने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील ५ लाख कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे. निश्चितच कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करणारा हा निर्णय घेतला जावा यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे आमदार सुभाष देशमुख यांना करण्यात आली आहे.