बालाजीनगर, दि.०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पाऊल उचलले नसते तर तुम्ही आम्ही इथे दिसलो नसतो. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्यामुळेच आपण आता या ज्ञान पंढरीचे वारकरी म्हणून शिक्षण घेत आहोत असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या सुविद्य पत्नी अंजली अवताडे यांनी केले.
त्या बालाजीनगर (ता. मंगळवेढा) येथील प्राथमिक/ माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे पंचायत समिती शिक्षण विभाग मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित किशोरी हितगुज मेळावा व नवभारत साक्षरता उल्हास मेळाव्यात त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. या किशोरी मेळाव्याचे अध्यक्षस्थानी बालाजी नगर आश्रम शाळा येथील विद्यार्थिनी सोनाली देवाप्पा खांडेकर ही होती तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रावणी लेंडवे ही होती. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, गटविकास अधिकारी योगेश कदम, बालाजी शिक्षण मंडळाचे मार्गदर्शक अमरसिंग रजपूत, मंगळवेढा नगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी अर्चना जनबंधू, आरटीओ अधिकारी गंगाधर मेकलवाल, वक्त्या दया वाकडे, स्वाती मोहिते, विजय माने, श्रीकांत पवार, हरिश्चंद्र राठोड, काशिनाथ पवार, परमेश्वर येणपे, पोलीस पाटील विठ्ठल पवार, गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे, शिक्षण विस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड, शामराव सरगर, प्राचार्य गणपती पवार, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व श्री बालाजी शिक्षण संकुलाचे संस्थापक स्वर्गीय लालसिंग रजपूत यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीस बालाजीनगर आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत, गणेशस्तवन व बंजारा नृत्य सादर केले.
अंजली आवताडे पुढे म्हणाल्या की, महिला शिक्षिका असो की मुलीची आई असो त्यांनी मुलींना एक मैत्रिण म्हणून उत्तम असे मार्गदर्शन केले पाहिजे, समाजातील चांगल्या व वाईट गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत, किशोरवयीन वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल या बाबी समजावून सांगितल्या पाहिजे. मुलींनी शिक्षण घेत असताना स्वतःच्या हक्काचा वापर करत आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंच व्हावी असा आदर्श निर्माण करावा असे आवाहन करत त्यांनी सर्वच मुलींना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी योगेश कदम म्हणाले, स्त्रीला जेव्हा उंबऱ्याच्या बाहेर पडणे सुद्धा अवघड होते अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम स्वतः शिक्षण घेतले व नंतर स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला. महिला मुख्याध्यापिका म्हणून त्यांचे नाव आजही जगामध्ये आदराने घेतले जाते. भविष्यात शिक्षण घेत असताना सोशल मीडियाचा वापर कमी करत उच्च शिक्षण घ्यावे व आपल्या गावाचे नाव उंचावले पाहिजे यासाठी सतत कार्यरत रहावे. कुटुंबामध्ये मुलगा व मुलगी हा भेदभाव न करता प्रत्येक काम दोघांनी केले पाहिजे व त्याची सवय शालेय जीवनापासूनच लावली पाहिजे.
सुप्रसिद्ध वक्त्या दया वाकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सकाळपासून अत्यंत आनंदाच्या वातावरणातले तुमचे चेहरे पाहून मला आनंद वाटतो आहे कारण हा आनंदी व हासरा चेहरा पूर्वी उंबऱ्याच्या आत व दाराच्या आत बंद होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाबाबत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न मुळे आज आपण येथे उपस्थित आहोत हे कधीही विसरता येणार नाही. आज आम्ही गुलामगिरीतून मुक्तता मिळवलेली आहे, आम्ही शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचलेलो आहोत परंतु आमची वैचारिक गुलामगिरी मात्र अजून दूर झालेली नाही. सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला स्वतःवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरुद्ध लढण्यासाठी शिक्षण दिलं परंतु ते शिक्षण कशासाठी दिल हेच आम्ही विसरलो आणि पोती पुराणाच्या वैचारिक गुलामगिरीत अडकलो. स्त्री हीच स्त्रीचा प्रथम शत्रू असल्याचे चित्र समाजात दिसते. जोपर्यंत ती तिचाच सन्मान करत नाही तोपर्यंत समाज हा तीचा सन्मान करू शकत नाही. यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे यांनी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
किशोरी हितगुज मेळाव्यात सकाळच्या सत्रात क्रीडाशिक्षक धनसिंग चव्हाण यांनी मुलींना विविध योगासन व व्यायामाबाबत शिक्षण दिले. गीतमंचातील सहशिक्षक दत्तात्रय येडवे, अमित भोरकडे व सहकारी शिक्षकांनी विविध गीत रचना सादर करून उपस्थित मुलींना प्रफुल्लित केले. दुपारच्या सत्रात संतोष दुधाळ यांनी योग शिक्षणाचे धडे दिले. तसेच उपस्थित असलेल्या शाळा मधील कलापथकातील विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत साऱ्यांचीच मने जिंकली. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
मेळाव्याचे प्रस्ताविक प्राचार्य गणपती पवार, सूत्रसंचालन संजय दवले यांनी तर आभार गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे यांनी मानले.