बालाजीनगर, दि.०२ : आश्रमशाळेत गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेण्यासाठी आलेली असतात. या मुलांना या परस्थितीची जाणीव असते. आश्रमशाळेत मिळणारे उच्च दर्जाचे शिक्षण व विद्यार्थ्यांची ध्येयासक्ती या बळावर आश्रमशाळेतील विद्यार्थी घडतो असे प्रतिपादन पशु चिकीत्सक डॉ. टी. टी. राठोड यांनी केले.
ते बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथील प्राथमिक, माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सरत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे स्वागत या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालाजी शिक्षण मंडळाचे मार्गदर्शक अमरसिंग रजपूत हे होते. विनोदी कलावंत अंबादास कणकट्टी, सेवानिवृत्त प्राचार्य सुनील नष्टे, प्राचार्य गणपती पवार, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार, प्रा.पायगोंडे, नंदुरचे ग्रामपंचायत सदस्य हणमंत पयगोंडे, पोलीस पाटील विठ्ठल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व संस्थापक स्वर्गीय लालसिंग रजपूत यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेतील मुलींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले तर सहशिक्षक सुरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील मुलींनी सादर केलेल्या गणेश स्तवन व बंजारा गीतांनी साऱ्यांचीच वाहवा मिळवित उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पशु चिकीत्सक डॉ. टी. टी. राठोड यांनी सांगितले की, आश्रमशाळेतून शिकणारा विद्यार्थी घडला जातो. आपण आयुष्यात एक ध्येय निश्चित केले तर आपल्याला यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर एम.बी.बी.एस. चे शिक्षण घ्यावे या ठिकाणी प्रवेश मिळत नसल्यास पशु वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य द्यावे. पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधीची माहिती त्यांनी विद्यार्थी वर्गास देऊन या क्षेत्रास आपले आयुष्य घडवावे असे आवाहन केले.
कला व शिक्षण कधीही वाया जात नाही असे नमुद करून चार्लीन चॅप्लिन फेम अंबादास कनकट्टी यांनी सुरवातीस विद्यार्थी वर्गातून प्रवेश करीत जीना इसीका नाम हैं या गाण्याच्या तालावर विद्यार्थी, मान्यवर यांची भेट घेत त्यांना आपलेसे केले. सकाळच्या प्रहारी होणारे विविध पक्षांचे आवाज काढत विद्यार्थ्यांना आनंदाच्या दुनियेत घेऊन गेले. चार्ली चॅप्लिन ची भूमिका साकारत त्यांनी विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना मनमुराद हसवले. फोनवरील संभाषण, तीन पॅक घेतलेला दारुडा, टांगेवाल्याचा घोडा, रेल्वेस्टेशन वरील विविध विक्रेत्यांचे आवाज, प्रवाशांचे आवाज, रेल्वेचा आवाज, लहान मुलांचां आवाज असे विविध आवाज सादर करून साऱ्यांच्याच टाळ्या मिळविल्या. तर शेवटी विद्यार्थ्यासमवेत बम बमं बोले या हिंदी गाण्यावर नृत्य सादर करत कार्यक्रमाची सांगता केली.
तसेच पुंडलिक साठे महाराज यांनी आई माझा मायेचा सागर, विसरू नको रे आई बापाला ही व अशी अनेक भावगीते सादर करीत विद्यार्थांना आपल्या आई- वडील, गुरुजन यांच्या कष्टाची जाणीव ठेवण्याची शिकवण दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अमरसिंग रजपूत सांगितले की, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना त्या क्षेत्राला कमी न समजता काम केल्यास जीवनात यशस्वी होता येते. श्री बालाजी शिक्षण संकुलात आमचे वडील स्वर्गीय लालचिंग रजपूत सर विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे. या कार्यक्रमामुळे येथील विद्यार्थी, शिक्षक परिसरातील पालक वर्ग यांना निखळ आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. आता त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून येथे विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहे यांचा मला खूप आनंद होतो आहे.
प्रास्ताविकात प्राचार्य गणपती पवार यांनी सांगितले की, संस्थापक स्वर्गीय लालसिंग रजपूत यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करत असताना शाळेतील विद्यार्थांना आनंदाचे क्षण वेचता यावेत या एकमेव उद्देशाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना आपण काही संकल्प केले पाहिजेत हे संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे तत्व नेहमी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
सरत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे स्वागत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी श्री बालाजी शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्रीधर कुलकर्णी यांनी तर आभार प्रा. विनायक राजमाने यांनी मानले.














