मंगळवेढा, दि.२७ : आपण किती काळ जगलो यापेक्षा कसे जगलो हे फार महत्त्वाचे आहे. आपण जडे सरांच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यानी भोवती जमवलेली माणसांची संपत्ती ठळकपणे दिसते. आजकाल काय झाले की आपल्या घरामध्ये चेकबुक आहे, पासबुक आहे पण वाचण्याची भूक नाही हे आजच्या जीवनाची फार मोठी शोकांतीका आहे. त्यामुळे आपण नेहमी आपल्या पासबुकात किती जमा किती खर्च किती शिल्लक पाहतो. पण मला वाटते की आयुष्याची पासबुक सुद्धा आपण तपासली पाहिजे हे आपण आयुष्यामध्ये नेमकं काय मिळवलं हे उमगतं. जडे सरांचं जर संबंध चरित्र आपण बघितलं तर या माणसांला डाॅ. निर्मलकुमार फडकुलें पासुन विजया जागीरदारांच्यापर्यंत साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या मंडळीचा सहवास लाभला. साहित्य परिषदेच्या माध्यमातून जे व्यासपीठ मिळालेले आहे त्या व्यासपीठाचा नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला अधिकाधिक वापर कसा करता येईल याचा देखील त्यांनी विचार केला. म्हणून शिक्षक म्हणून त्यांनी दिलेले योगदानाने कर्तृत्व संपन्न विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या आणि दुसरे म्हणजे साहित्य परिषदेचा कार्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य महत्वाचे आहे आणि अशा कार्यकर्त्यांचा साहित्य परिषदेला अभिमान वाटतो हे असे गौरवोद्गार म.सा.प.पुणे चे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी याने काढले.
मसाप दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, पुर्वी कार्यकर्ते घरचे डबे घेऊन येत असत आता धाब्याची आणि बारची व्यवस्था करावी लागते. स्वतःचे पैसे खर्चुन राबणारा कार्यकर्ता हरवला आहे. साहित्य परिषदे मध्ये की दर महिन्याला किती पैसे मिळतात असं कांहीना वाटत. वेगवेगळी महामंडळ आहे तसे हे साहित्याचं महामंडळ वाटते. आमची पदही सेवेची पद आहेत. असं सेवेचे पद सांभाळण्यासाठी जे प्रकारची मानसिकता लागते ती आज हरवत चाललेली आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये संस्थांना कार्यकर्ते कसे मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे ? या पंचतारांकित संस्कृतीतून एक चंगाळवाद निर्माण होतो. जागतिकीकरणानंतर जो एक चंगाळवाद आपल्याकडे आला एकेकाळी विद्वत्ता सदवर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते आज ते राहिलेले नाही. तुमच्या हातामध्ये कुठला मोबाईल आहे, तुम्ही कुठल्या गाडीतून फिरता, तुम्ही कुठल्या भागांमध्ये राहता यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरवली जाते आणि मुख्य म्हणजे पैसे फेकले की कुठलीही गोष्ट विकत घेता येते अशी जी एक मानसिकता समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे जडे सरांच्या सारख्या माणसांच्या कामाकडे दुर्लक्ष होण्याची फार मोठी शक्यता असते पण आज त्यांच्या अमृत महोत्सवी समारंभाला आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते एका शिक्षकाप्रती आपण तो व्यक्त केलेला आदर आहे तो दुर्मिळ आहे. पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावरती यावी असं वातावरण सभोवती असताना जडे सरांच्या सारख्या एका निष्ठेने काम केलेल्या माणसाचा सत्कार हा समाजाचा नैतिक बळ वाढवणारा आहे. तुमच्या कामाची नोंद समाज ठेवत असतो. 75 वर्षाच्या जडे सरांच्या या सबंध वाटचालीकडे जर आपण मागे वळून पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येईल की त्यांचा आयुष्य समृद्ध आहे आणि ते केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी जगलेले नाहीत तर स्वतःचं समृद्ध आयुष्य जगत असताना समाजासाठी आपल्याला काय करता येईल याचा सुद्धा विचार त्यांनी केलेला आहे, आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी जडे वहिनींना सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद देतो की असा कवी त्यांनी इतकी वर्ष सांभाळला, याबद्दल आपण टाळ्यांच्या जोरदार गजर केला पाहिजे.
अध्यक्षपदावरुन बोलताना ज्येष्ठ कवी, लोकनेते राजाराम बापु ललितकला अकादमीचे निमंत्रक प्रा.प्रदीप पाटील म्हणाले, माणसं नुसती चांगले असून उपयोगाची नाहीत. एकदा एका माणसाला घेऊन गांधीजींचा एक शिक्षक गांधीजींच्या कडे गेला आणि गांधीजींना म्हणाले हे स्वभावाने खूप चांगले आहेत. त्यावेळी गांधीजी म्हणाले, त्याचा देशाला उपयोग काय ? म्हणजे माणूस नुसता चांगला असून चालत नाही तर त्याची उपयोगिता देशाच्या संदर्भात काय आहे. एक माणूस शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून येतो आणि एक सांस्कृतिक व्यवस्था निर्माण करतो तेच काम प्रकाश जडे यानी केले आहे. जडे सर पुस्तकांच्या सहवासात वावरताना एका विनाअनुदानित शाळेचे मुख्याध्यापक स्वीकारत त्या शाळेला प्रतिष्ठा प्राप्त करून देतो समृद्धी प्राप्त करून देतो, ग्रंथालय समृद्ध करतो. यावेळी सोलापुर विद्यापिठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी शिंदे व प्रभाकर जमखंडीकर यानी आपले विचार मांडले तर देवेंद्र औटी यानी कविता सादर केली. तसेच यावेळी डॉ. दत्ता सरगर यानी संपादीत केलेल्या “प्रकाश जडे : सर्जनशीलता आणी कृतिशीलता” या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या समारंभाच्या प्रारंभी स्मिता जडे यानी सर्वाचे स्वागत केले. प्रा.विश्वनाथ ढेपे यानी प्रास्ताविक केले. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार यानी या सोहळ्याची भुमिका सांगितली. समारंभाचे सुत्रसंचालन अवंती पटवर्धन यानी केले तर डाॅ.दत्ता सरगर यानी आभार मानले.
यावेळी उद्योगपती संजय आवताडे, प्रा.डाॅ.विद्यासागर पाटंगणकर, डाॅ.महेश खरात, डाॅ.वामन जाधव,सुभाष कवडे, सोलापुर महापालिकेचे उपायुक्त गिरीश पंडित, लेखिका आशा पाटील, भिमराव मोरे, ॲड.भारत पवार, आनंद लोकरे, कल्पेश कांबळे, विद्या शिंदे, प्रतिभा जमखंडीकर, गोरक्ष जाधव, रुपाली जाधव, कवयित्री मनिषा पाटील, दया वाकडे, भारती धनवे, डाॅ.तनुजा होनमाने, जयश्री कवचाळे, रवि क्षीरसागर, ॲड.क्षिरसागर, शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, नगराध्यक्षा अरुणा माळी, सोमनाथ माळी, वंदना तोडकरी, दिगंबर भगरे, संभाजी सलगर, लहु ढगे, डाॅ.शरद शिर्के, डाॅ.प्रीती शिर्के, ॲड. दत्तात्रय तोडकरी, राजेंद्र पोतदार, पोपट महामुरे, शिवाजी काशिद, पंढरीनाथ जोशी, डाॅ.अतुल निकम, नागेश धनवे, डाॅ.होनमाने, दिगंबर यादव, डाॅ.दीपक वेदपाठक, प्रा. मेघा धर्माधिकारी, हिरा वेदपाठक, डाॅ.नमिता नायगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.