मेंदूला विचारांची गरज असते आणि विचारांना विज्ञानाची गरज असते. कारण विज्ञान हा शब्द Scire या इंग्रजी शब्दातून निर्माण झाला. या शब्दाचा अर्थ कापणे असा आहे. विज्ञानाच्या तत्त्वांवर अधिष्ठित झालेली व्यक्ती चिकित्सक, तर्कनिष्ठ, सजग, कल्पक असते अशाच एका विज्ञाननिष्ठ शिक्षकाच्या कार्याचा उहापोह या लेखांतून …
मा. प्रकाश जडे सर यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत नोकरीला सुरुवात केली. मानवी मेंदूचा डावा भाग हा तर तर्कनिष्ठ मेंदू संबोधला जातो तर उजवा मेंदू हा कलात्मक आहे सरांनी या दोन्ही मेंदूंचा प्रभावी वापर केला. विज्ञानात कला अंतर्भूत करून विज्ञानासारखा रुक्ष विषय शाळेतून समाजात आणि समाजातून गावागावांत पोहोचविला. Laboratory to field ही संकल्पना त्यांनी ४० वर्षांपूर्वी प्रत्यक्षात अमलात आणली. एक झपाटलेला विज्ञान शिक्षक आपल्या कार्याचा तसा किती प्रज्वलित करू शकतो. हे त्यांच्या विज्ञान कार्यातून प्रदर्शित होते.१९९०-२००० या दशकात साधनांचा तुटवडा होता. माध्यमांची वाणवा होती. भौतिक सुविधांची कमतरता होती. अशा कालखंडात संबंध मंगळवेढा तालुक्यात त्यांनी विज्ञानाचा झंजावात निर्माण केला. निश्चितच त्याकाळी विज्ञान प्रदर्शने भरविणे जिकरीचे, कष्टाचे काम होते. त्या काळात अत्यंत प्रभावी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजक( सद्यस्थितीपेक्षाही अत्युतम) केले. सर्व विषय हे एकाच गंगोत्रीचे प्रवाह आहेत. हे त्यांनी प्रात्यक्षिकातून सिद्ध केले. विज्ञान म्हणी, कविता, व्यंग्यचित्रे इत्यादी माध्यमातून त्यांनी विज्ञानाची व्यापकता वाढवली. तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची मांदियाळी उभी करून विज्ञानाचे सारस्वत निर्माण केले. विज्ञान प्रेमी शिक्षकांची मोट बांधून विज्ञानाची प्रभावी चळवळ जडे सरांनी संबंध मंगळवेढा तालुक्यात उभारून नेटाने पुढे नेली. त्यांची दखल संपूर्ण जिल्हा सोलापूर जिल्ह्याने घेतली. जिल्हास्तरावर आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित झाले. या त्यांच्या चळवळीत त्यांना स्व. बी.टी. पाटील व गुरुसिद्ध येळदरे, स्व.मनोहर कवचाळे आदी धुरीणांनी त्यांना मनस्वी सहकार्य केले. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी एन.बी.पाटील हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते.
‘विज्ञान परम् ध्येयम्’ या उक्तीप्रमाणे त्यांनी त्या काळात आजच्या इतकी छपाई साधने उपलब्ध नसताना दरवर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात विज्ञान अंक प्रकाशित केले. त्यावेळीची विज्ञान प्रदर्शने म्हणजे एक पर्वणीच होती कारण, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असायचे भान ठेवून नियोजन आणि बेभान होऊन अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवल्याने विज्ञानाची आवड व प्रसार अतिशय वेगाने झाला. इतर तालुक्यांतही याची चर्चा व्हायची. लक्ष्मण नागणे यांनी ही चळवळ माळशिरसच्या वेळापूरपर्यंत नेली. मला एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावी वाटते यांचे इतके सूक्ष्म नियोजन असायचे अगदी स्नान कमिटी, अल्पोपहार कमिटी, निवास कमिटी या कमिट्या त्यांचे द्योतक आहेत. तीन दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामधील वस्तूंची मांडणी, विज्ञान तक्त्यांचे प्रदर्शन, विज्ञान चित्रांचे प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान व अंधश्रद्धा यावरील व्याख्याने व परिसंवाद जी पुण्या मुंबईमध्ये व्हायची ती खुपसंगी, बोराळे, सलगर या ठिकाणी होऊ लागली. साधनांची वाणवा असली तरी दुर्दम्य इच्छा शक्तीद्वारे ते सहज शक्य होत गेले. विज्ञानाशी प्रचंड तादात्मक पावल्याने विज्ञानाची प्रचंड अभिरुची निर्माण झाल्याने मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यातून त्याकाळी अनेक डॉक्टर, अभियंते, अधिकारी निर्माण झाले.
प्रकाश जडे सरांनी आपली कल्पकता, सजगता, परमसविष्णुता आधी गुणांद्वारे अनेकांच्या हृदयात विराजमान झाले. ‘केल्याने होते आहे रे’ हा त्यांचा संकल्प आम्हा सर्व विज्ञान शिक्षकांसाठी तो मैलाचा दगड आहे. बऱ्याच जणांना त्यांची ओळख साहित्यिक, बापलेकिनचे अंत:करण उलगडणारा कवी, प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, लेखक इतकीच आहे नव्हे तर ज्यांच्या मनात अनेक भौतिक रासायनिक स्पंदने हिंदोळ्या घालतात असा कल्पक शिक्षक, उत्तुंग विचारांचा प्राचार्य दडला आहे. अनेकांना निवृत्तीचे वय म्हणजे शिक्षा वाटते. लेकीसुनांमध्ये नातवंडांमध्ये गुंतणारे वय. किंबहुना वानप्रस्थ न्यायाने तिर्थाटनासाठी आसुसणारे हे वय. मात्र, ‘तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ या न्यायाने व ‘कर्मण्ये वाधिका रस्ते’ या तत्त्वाने ते कार्यरत आहे. एक शिक्षक किती व्यासंगी असतो याचे ज्वलंत उदाहरण शोधायचे असेल तर आजही कविवर्य प्रकाश जडे यांच्याकडे पहावे लागेल. ते आजही मसाप दामाजी नगर शाखेत तत्पर आहेत. मानवी जन्माची इतिकर्तव्यता त्यांच्या विचारांत आहे. इतरांना मोठे करण्याची आर्जवता त्यांच्या देहबोलीत आहे. म्हणूनच त्यांच्या सानिध्यात काही क्षण व्यतीत करणे ही पर्वणी ठरते. ते काही वेळा अबोल जरी असले तरी ‘शब्देविन संवादू गुजेविन अनुवादू’ याचा प्रत्यय येतो. म्हणूनच ते वयाच्या पंच्याहत्तरीतही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहेत. कारण Age is just number असेच त्यांना वाटत आले आहे. त्यांच्या धामन्यातील सळसळते चैतन्य, चेहऱ्यावरील मार्दवता अनेकांना आपलीशी करते. अशी व्यक्तिमत्त्वे आपसुकच मोठी होतात. सम्यक ज्ञानाची प्रचंड लालसा असलेला हा उपासक याच उमेदीने नवीन सूर्योदयाची वाट पाहतो आहे. अनेकांसाठी हा प्रांतस्थ त्यांच्या जीवनाच्या वाटा निर्माण करतो आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘तुम जिओ हजारो साल’