मोहोळ, दि. २७ : मोहोळ येथील नेताजी प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोहोळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके, संस्थचे चेअरमन डॉ.एम.ए.गायकवाड, संस्थचे संचालक जनार्दन कोळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य दत्तात्रय काशीद, मुख्याध्यापिका अरुणा गायकवाड, पर्यवेक्षिका शमा शेख, जेष्ठ प्राध्यापिका सविता गादेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्याच्या शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास होण्यासाठी क्रीडेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. नेताजी प्रशालेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा क्रीडा सप्ताहात सहभाग आहे.
या क्रीडा सप्ताह मध्ये हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो या सांघिक खेळाचा तर वैयक्तिक खेळाचा ही समावेश करण्यात आला आहे. क्रीडा स्पर्धेबरोबरच रांगोळी स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम पुढील आठवडाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य दत्तात्रय काशीद यांनी दिली. उद्घाटन प्रसंगाच्या मनोगतात एपीआय अंजना फाळके यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खेळाचे महत्व सांगितले खेळाने केवळ शारीरिक सुदृढता नव्हे तर मानसिक सदृढता सुद्धा सुधारते त्यामुळे खेळाला जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हे सांगताना त्यांनी अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जनजागृती व्हावे व नकळत विद्यार्थ्यांच्या हातून कोणते गुन्हे घडतात? आणि आयुष्याचे कसे नुकसान करून घेतात हे त्यांनी उदाहरणे देऊन पटवून दिले. मुलांना व मुलींना पॉक्स कायद्याची माहिती देऊन, १०९८ व ११२ या हेल्पलाइन ची माहिती विद्यार्थ्यांना दिली क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती करण्याचे कार्य केले केले.
क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पराभव व विजय सहजपणे पचवता यावा यासाठी शालेय क्रीडा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शालेय पाठ्यपुस्तकातून बौद्धिक तर क्रीडांगणाच्या माध्यमातून शारीरिक विकास विद्यार्थ्यांचा होत असतो आणि हेच विद्यार्थी समाजाचे भावी सुजाण नागरिक असतात त्यामुळे शालेय जीवनात खेळाचे महत्व अधोरेखित करण्यासारखे आहे असे मत प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एम.ए गायकवाड यांनी व्यक्त केले. प्राचार्य दत्तात्रय काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा पार पडत आहेत क्रीडा स्पर्धेचे नियोजन क्रीडाशिक्षक मोहन आयवळे, विकास पाटील यांनी केले तर क्रीडा स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.











