मंगळवेढा, दि.18 : सुमारे दीड हजार पणत्यांचा लख्ख प्रकाश, रांगोळीच्या सहाय्याने बनविलेली महादेवाची पिंड, दीपोत्सव 2024 ची रांगोळी, दीपमाळ, विहिरीतील थर्माकोलचे ब्रम्हकमळ, फटाक्यांची आतषबाजी आदींमुळे सोमवारी सायंकाळी मंगळवेढयातील गणेश मंदिर परिसर गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. निमित्त होते कार्तिक संकष्टीनिमित्त श्री गणेश परिवाराने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे.
सांगली येथील श्री गणपती पंचायतन संस्थानचे मंगळवेढा शहरात चोखामेळा चौकात श्री गणेश मंदिर असून गेल्या वीस ते बावीस वर्षापासून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
सोमवारी पहाटे देवयानी देशमुख व सहकारी भगिनींनी अथर्वशिर्ष पठण केले. शेकडो दीप तेवू लागल्याने दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला होता. या दीपोत्सवामध्ये भजनरत्न महादेव यादव (मारापूर) यांच्या सुश्राव्य अशा भजनाच्या कार्यक्रमाने मंगळवेढेकर मंत्रमुग्ध झाले. यावेळी सायंकाळचे वातावरण भक्तीमय व सुरमय बनले होते.
सायंकाळी पुरोहितांकडून श्री गणेशाची विधीवत पूजाअर्चा करून मंत्रोच्चारात श्री गणेशाची आरती करण्यात आली. मंदिरातील उजव्या सोंडेची श्री गणेशाची मुर्ती सिध्दीविनायक नावाने ओळखली जाते.
देवयानी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोमल घोडके, शितल घोडके, राधिका घोडके, अमृता पोतदार, पूजा करमरकर, ऋतुजा करमरकर, अलिशा मुलाणी, माही बजाज, परी राऊत, श्रावणी करमरकर, आर्या राऊत, मानसी रायबान, मनस्वी रायबान, ऋतुजा घुले, समृध्दी गोरे, पूर्वा बडोदकर, मिनाक्षी बडोदकर, पूजा बडोदकर, सोहम घोडके आदींनी मंदिर परिसरामध्ये आकर्षक रांगोळी काढली होती. मतदान जागृती करण्यासंदर्भातही परिसरामध्ये रांगोळी काढण्यात आली होती.
मंदिरासमोरील विहिरीमध्ये पेंटर सदाशिव जामदार यांनी थर्माकोलच्या सहाय्याने बनविलेले ब्रम्हकमळ, अशोकानंद राक्षे व सहकार्यांनी रांगोळीच्या सहाय्याने बनविलेली सुबक व आकर्षक महादेवाची पिंड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मुनीर जहाँगीर मुलाणी यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंदिर परिसर आकर्षक रंगावलीच्या व पणत्यांच्या सहाय्याने सजविण्यात आला होता.