मंगळवेढा, दि.०९ : रयत शिक्षण संस्थेचे हनुमान विद्यामंदिर, मरवडे या शाळेतील शैक्षणिक वर्ष १९९४-९५ च्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी तब्बल तीस वर्षानंतर एकत्र येत शाळेतील जुन्या सप्तरंगी आठवणी जाग्या केल्या. निमित्त होते गेट-टुगेदरचे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन पर्यवेक्षक भिकाजी वाघ हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान मुख्याध्यापक हणमंत वगरे होते. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन केले. कोविड मध्ये व दरम्यान मृत्यू पावलेल्या गुरुजनांमध्ये कै. यादव, कै.बागल, आप्पा कुंभार (शिपाई) , मसाजी ढावरे (शिपाई ) , विद्यार्थ्यांमध्ये आमचे हरहुन्नरी वर्गमित्र राजेंद्र जाधव यांना श्रद्धांजली वाहिली.
सर्वप्रथम इयत्ता दहावीत असल्याचा फील येण्यासाठी परिपाठ घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी पांढरी टोपी घातली होती. परिपाठानंतर हास्यविनोद करत वर्गात तत्कालीन वर्गशिक्षक श्री. माने यांनी हजेरी घेतली. आज जे गैरहजर आहेत त्यांना शिक्षा म्हणून त्या मुलानी पुढील गेट-टुगेदर चा सर्व खर्च करावा असे ठरले . याप्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्व गुरुजनवर्ग, शिक्षक, इतर कर्मचारी यांचा माजी विद्यार्थ्याकडून शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी प्रत्येकांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
प्रस्ताविकात माजी विद्यार्थी महेश गवळी यांनी सांगितले की “जमले सारे सवंगडी गप्पा करूया मनातल्या…. सप्तरंगी आठवणी शाळेतल्या” ही थीम घेऊन सर्व गुरुजनांना नतमस्तक होऊन मानवंदना दिली. आई-वडिलांनंतर जर कोणी आधार देत असेल तर ते आहेत आपले गुरुजन आणि घरानंतर आपल्याला जगण्याचा मार्ग कोण दाखवत असेल तर ती आहे शाळा ! आज आपले गुरुजन भेटले म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल भेटले आहेत असे सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. उपस्थित सर्व मुलांनी आपला परिचय थोडक्यात करून दिला. सर्वांचा परिचय ऐकताना गुरुजनांना धन्य धन्य वाटत होते. विद्यार्थी मनोगतामध्ये अनेक माजी विद्यार्थ्यांनी जुन्या शाळेतील आठवणी सांगितल्या. ३० वर्षानंतर जुन्या आठवणी ऐकून प्रत्येकाला कधी हसू आले तर कधी रडू आले. दत्ता गणपाटील (उदयोगपती), नितीन घुले (माजी सरपंच ), नितीन साठे, महेश गवळी, राजू पवार, दत्ता माने, अपर्णा घुले या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांचे शाळेबद्दलचे प्रेम पाहून विद्यमान प्राचार्य श्री. वगरे यांनी समाधान व्यक्त केले. श्री.नेहरू बागल यांनी मरवडे गाव हे खूपच दानशूर असून सुंदर आहे शाळेसाठी आतापर्यंत बऱ्याच देणग्या मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन वर्गशिक्षक श्री. माने यांनी शाळेचा शंभर टक्के निकाल लागण्यासाठी कसे प्रयत्न करत होतो हे सांगितले. शिक्षक महादेव डांगे यांनी व्यायामाचे व वाचनाचे महत्त्व सांगून प्र के आत्रे यांचे विनोद सांगितले. शिक्षक युवराज क्षीरसागर सरांनी आदर्श नागरिक बना असा सल्ला दिला. शिक्षक श्री एम्भतनाळ हे विजापूर या ठिकाणाहून येऊन मुलांना खूपच चांगले विचार देऊन गेले. तत्कालीन क्रीडाशिक्षक जगदने हे पीटीचे शिक्षक असूनही त्यांनी खूपच भावनिक होऊन मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे तत्कालीन पर्यवेक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष भिकाजी वाघ यांनी जुन्या कविता म्हणून आम्हाला ताल धरायला लावला. गरीब परिस्थिती असून आम्ही शिकलो आणि तुम्हाला घडविण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबाला जास्त वेळ न देता शाळेसाठी दिला. ७०-७५ वर्षे वय असूनही त्यांनी स्वतःबरोबर आम्हालाही रडवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया घाडगे-कोंडुभैरी यांनी तर आभार प्रदर्शन सदानंद येडसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिताराम पवार, शहाजी शेणवे, विठ्ठल फटे, विलास पवार, ज्ञानोबा शिंदे, पांडुरंग काटकर व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .