महेश पाटील, सलगर बुद्रुक
सलगर बुद्रुक, दि.०६ : शाळेत केलेली मस्ती, एकत्रित केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर असलेला वचक, सांस्कृतिक कार्यक्रमांची धामधूम, एकत्रित खेळलेल्या क्रीडा स्पर्धा या आठवणींच्या ओघात आपण लहानाचे मोठे झालो हेच सर्वजण विसरले होते, निमित्त होते स्नेहमेळाव्याचे.
दिवाळी सणाचे औचित्य साधून 21 वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सलगर बुद्रुक मधील विद्यामंदिर हायस्कुल येथे पार पडला. तब्बल 21 वर्षांनंतर भेट झाली होती. सर्व जण जुन्या आठवणीत हरवून गेले होते.जीवलगांच्या भेटीने वातावरण भारावून गेले होते. आयुष्याला थोडंसं थांबवून सर्व मित्र कंपनी पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात जुन्या आठवणींना उजाळा देत होती.प्रेम,उत्सुकता अन आठवणींच्या भावसागरामुळे कांही मित्रांचे आनंदाश्रू नकळत ढळत होते. एकूणच 21 वर्ष आपापल्या आयुष्याची कोडी सोडवत जगत असताना कांही तासांचा थांबा आयुष्याला वेगळा रंग देऊन गेला.
दरम्यान यावेळेस कुमार गंधर्वांच्या कवितेतील कांही ओळी आठवल्या नाहीतर नवलच…
” ऋणानुबांधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्ठता मोठी
कधी जवळ सुखाने बसलो, दुःखात सुखाला हसलो
कधी गहिवरलो, कधी धुसफूसलो
जन्मात जमली ना कोणाशी गट्टी
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्ठता मोठी…
या स्नेह मेळाव्यासाठी 25 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. तसेच मुरलीधर लिगाडे व एस पी तेली या गुरुजनांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांच्या आग्रहांचा सन्मान पूर्वक स्वीकार केला.
कार्यकर्माचे अध्यक्ष मुरलीधर लिगाडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सुयश चिंतले. ते भावविवश झाल्याचे पहायला मिळाले. उपाध्यक्ष एस.पी.तेली यांनी आपल्या मनोगतातून लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. विद्यार्थी शशिकांत आसबे यांनी व्यायामाचे महत्व समजावून सांगितले. नागेश चिनगे यांनी विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करावेत ही सूचना केली. उत्तम पडवळे यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अमृतलिंग बिळुरगी यांनी शाळेला व मित्रांना कधींच विसरणार नसल्याचे सांगितले, संतोष धायगोंडे यांनी गरीब परिस्थितीत घेलतलेल्या शिक्षणाचे अनुभव कथन केले. राहुल कांबळे यांनी इंग्रजी विषयाबद्दल शिक्षकांच्या शिकवण्याच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. गावचे माजी सरपंच तानाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. एकूणच सर्वांनी आपापल्या मनोगतातून भावनांना मोकळी वाट करून दिली.
दरम्यान गेल्या 21 वर्षात कांही विद्यार्थी व गुरुजण वैकुंठवासी झाले होते, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला. तदनंतर सर्व विध्यार्थ्यांची ओळख परेड अन भाषणे झाली. सर्वांचा यथोचित सत्कार केला गेला. भविष्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्यानिमित्ताने स्नेह मेळावे आयोजन करण्याचे ठरले.
यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर लिगाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे माजी सरपंच तानाजी जाधव, एस.पी.तेली आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण लिगाडे यांनी केले तर आभार शशिकांत आसबे यांनी मांडले. अल्पोपहाराची सोय बिरु बनसोडे यांनी केली. हा स्नेह मेळावा पार पाडण्यासाठी प्रवीण लिगाडे, संजय बजंत्री, विक्रम साळुंखे, अमृतलींग बळूरगी आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.