मंगळवेढा, दि.०५ : श्री विद्या विकास मंडळ संचलित, श्री संत दामाजी महाविद्यालयामधील वरिष्ठ विभागातील 2001 ते 2003 च्या बॅचच्या माजी 110 विद्यार्थ्यांनी 21 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत गेट-टुगेदरचा कार्यक्रम येथील महविद्यालयाच्या हॉलमध्ये घेत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला आर्थिक मदत मिळवून देण्याचा संकल्प केला.
यावेळी अनेकांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य औदुंबर जाधव होते. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्याकडून महाविद्यालयातील सर्व आजी-माजी प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच मागील काही काळात आणि कोविडमध्ये मृत्यू झालेल्या शिक्षक व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य औदुंबर जाधव, माजी प्राचार्य, मारुतीराव जगताप, विद्यार्थी संघाचे समन्वयक प्रा.डॉ. राजेश गावकरे, प्रा.डॉ. संजय शिवशरण हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नवनाथ जगताप मेघाली सोनवले,अर्चना कोरे, रोहिणी पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तेजस्विनी राजमाने,सारिका दत्तू यांनी विविध गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. डॉ.मिलिंद आवताडे ‘पल, पल दिल के पास, तुम रहती हो ‘ हे गीत सादर करीत वाहवा मिळविली. फनी गेम्सचा कार्यक्रम संतोष अडगळ यांनी घेतला. कवी इंद्रजित घुले, जितेंद्र लाड यांनी विविध विषयावरील कवितांच्या माध्यमातून मनोरंजन केले. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासाठी प्रताप सावंजी, रोहिणी पवार, संतोष शिंदे, विकास जाधव, विनायक यादव, संदीप हजारे, अश्विनी नागणे, मेघाली सोनवणे, आनंद मुढे आदींनी पुढाकार घेतला होता. या मेळाव्यात 110 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
शाळेतील माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. उद्योजक तर कुणी व्यवसायिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. अशा माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून 45 शी कडे झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत. त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच; पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रम संपल्यानंतर जाताना मात्र मित्र-मैत्रिणीपासून दूर जाताना पुन्हा भेटू या निरोपाने भावविवश झाले होते. प्रास्ताविक संतोष शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत घुले यांनी तर आभार अश्विनी नागणे यांनी मानले.