महालिंगराया- बिरोबा यांच्या नावाने चांगभलं’ हुलजंतीत रंगला महालिंगराया- बिरोबा पालखी भेट सोहळा

अशी झाली भाकणुक ; जे सत्य आहे तेच टिकेल

मंगळवेढा, दि.०१: धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या महालिंगराया यांच्या हुलजंती (ता.मंगळवेढा) या तीर्थस्थानी हुन्नूरचा बिरोबा व हुलजंतीचा महालिंगराया या गुरु शिष्यांच्या पालखींचा भेट सोहळा मंदिराशेजारील ओढ्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत रंगला. या भेट सोहळ्या दरम्यान ‘महालिंगराया- बिरोबा यांच्या नावाने चांगभलं’ या जयघोषाने तसेच नगारे, ढोल यांच्या आवाजाने सारा परिसर निनादून निघाला होता.

दक्षिण भारताचा विठ्ठल म्हणून ओळखल्या जात असलेल्या महालिंगरायांच्या यात्रेसाठी हुलजंती येथे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हुलजंती येथे दिवाळीत होते असलेल्या यात्रासोहळ्यास आज बिरोबा व महालिंगराया या गुरु शिष्यांच्या पालखी भेट सोहळ्याबरोबरच सोन्याळचा विठुराया, उटगीचा भरमलिंगदेव, शिरढोणचा बिरोबा – शीलवंती, बिज्जारगीचा बाळाप्पा, जिराअंकलागीचा बिराप्पा यांच्याही पालख्यांचा भेट सोहळा पार पडला.

या भेट सोहळ्या दरम्यान आकाशात उधळल्या जाणाऱ्या लोकर, भंडारा, खोबरे या उधळणीने सारा परिसर न्हाऊन निघाला होता. हा भेट सोहळ्याचा लाखो भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेतला.

आपण झेप संवाद न्यूज वाचत आहात. बातमी आपणही वाचा अन् इतरांनाही फॉरवर्ड करा.

भेट सोहळ्यानंतर मंदीर परिसरात भाकणुक होते. या भाकणुकीला सोलापूर येथील सिद्धरामेश्वर यांच्या भाकणुकीबरोबर महत्व असल्याने व भाकणुकीच्या आधारे बळीराजाकडून पुढील वर्षाची गणिते आखली जात असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. यावेळी राजकारणात प्रचंड प्रमाणात उलथा पालथ होईल व तीन तेरा नऊ अठरा अशी परिस्थिती निर्माण होऊन गोंधळाची परस्थिती निर्माण होईल, पुढील वर्षी पाऊसकाळ चांगला राहील, ज्याच्या घरी बैल त्यांना सोन्याची किंमत येईल, जे सत्य आहे तेच टिकेल अशी भाकणुक भेट सोहळ्यानंतर मंदीर परिसरात करण्यात आली.

भेट सोहळ्यास आमदार समाधान आवताडे, मनसे नेते दिलीप धोत्रे, भगीरथ भालके, अनिल सावंत तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्तींनी हजेरी लावली.

हुलजंती येथे यात्रासोहळ्यास भाविकांना विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडून नियोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड,पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर मंगळवेढा आगाराच्यावतीने यात्रेसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here