मंगळवेढा, दि.०१ : धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या महालिंगराया यांच्या हुलजंती (ता.मंगळवेढा) या तीर्थस्थानी आज शुक्रवार (दि.०१) रोजी होणाऱ्या हुन्नूरचा बिरोबा व हुलजंतीचा महालिंगराया या गुरु शिष्यांच्या पालखींचा भेट सोहळा मंदिराशेजारील ओढ्यात दुपारी चार वाजता रंगणार आहे. या भेट सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे तीन लाख भाविक हुलजंती येथे दाखल झाले आहेत.
दक्षिण भारताचा विठ्ठल म्हणून ओळखल्या जात असलेल्या महालिंगरायांच्या यात्रेसाठी हुलजंती येथे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हुलजंती येथे दिवाळीत मोठ्या प्रमाणात यात्रासोहळ्यास सुरुवात झाली असून सोमवारी बिरोबा व महालिंगराया या गुरु शिष्यांच्या पालखी भेट सोहळ्याबरोबरच सोन्याळचा विठुराया, उटगीचा भरमलिंगदेव, शिरढोणचा बिरोबा – शीलवंती, बिज्जारगीचा बाळाप्पा, जिराअंकलागीचा बिराप्पा यांच्याही पालख्यांचा भेट सोहळा पार पडणार आहे.
या भेट सोहळ्या दरम्यान ‘महालिंगराया- बिरोबा यांच्या नावाने चांगभलं’ या जयघोषाने तसेच नगारे, ढोल यांच्या आवाजाने सारा परिसर निनादून निघतो तर आकाशात उधळल्या जाणाऱ्या लोकर, भंडारा, खोबरे या उधळणीने सारा परिसर न्हाऊन निघतो. हा भेट सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी असल्याने भक्तगण हजेरी लावतात.
भेट सोहळ्यानंतर मंदीर परिसरात भाकणुक होते. या भाकणुकीला सोलापूर येथील सिद्धरामेश्वर यांच्या भाकणुकीबरोबर महत्व असल्याने व भाकणुकीच्या आधारे बळीराजाकडून पुढील वर्षाची गणिते आखली जात असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. हुलजंती येथे यात्रासोहळ्यास भाविकांना विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडून नियोजन करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.