सोलापूर, दि. 24 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रशिक्षणाचे आदेश निर्गत करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्तव्यातून सवलत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना ड्यूटीतून सूट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने दि. 9 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी , डॉ.अर्चना निकम यांची भेट घेऊन निवडणूक प्रशिक्षणपू्र्व कर्मचारी याद्या अद्ययावत करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सध्या निवडणूक प्रशिक्षणाचे आदेशात अनेक तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दि. 23 आँक्टोंबर रोजी जिल्हा निवडणूक शाखेत पुन्हा भेट घेऊन श्रीमती सरस्वती पाटील , एस. सी. परदेशीमठ यांची भेट घेऊन निवडणूक कर्तव्याच्या अनुषंगाने खाली नमूद बाबींवर चर्चा केली.
1) दुर्धर आजार , दिव्यांग शिक्षक कर्मचारी तसेच बालसंगोपनाची जबाबदारी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून सवलत द्यावी.
2) बी.एल.ओ. म्हणून कार्यरत शिक्षकांना पहिल्या प्रशिक्षणापूर्वीच निवडणूक कर्तव्यातून वगळण्यात यावे.
3) प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून देण्यात आलेले आदेश स्थगित करुन इतर मतदान अधिकारी म्हणून दुरुस्ती आदेश द्यावेत .
4) सर्व आस्थापनेतील पुरुष कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेऊन महिलांना निवडणूक कर्तव्यातून वगळण्यात यावे . त्यातूनही आवश्यकता असल्यास महिलांना स्थानिक परिसरात ड्यूटी द्यावी.
5) वयाची 55 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून वगळण्यात यावे.
6) दुसरे निवडणूक प्रशिक्षण देखील स्थानिक तहसील कार्यालयाच्या अधिनस्त घेण्यात यावे .
7) निवडणूक कर्तव्यावर जाण्यासाठी व परतण्यासाठी अंतराची अट न ठेवता एस.टी. बसची व्यवस्था पूर्ववत ठेवण्यात यावी.
8) निवडणूक प्रशिक्षणे व अन्य बाबींचे नियोजन करताना दिपावली सुट्टीचा कालावधी विचारात घ्यावा.
9) पती ,पत्नी दोघांनाही निवडणूक आदेश देण्यात आले असतील तर त्या दोहोंपैकी एकाला कौटुंबिक अडचणी विचारात घेऊन एकाला वगळण्यात यावे .
याबाबतीत पहिल्या पाच मागणी संदर्भात तालुका निवडणूक शाखांना स्पष्ट निर्देश देण्याची ग्वाही दिली तर उर्वरित बाबतीत अप्पर जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे , राज्य प्रतिनिधी अनिल बंडगर , मोहोळ शाखेचे अध्यक्ष चरण शेळके , दक्षिण सोलापूर शाखेचे अध्यक्ष अन्वर मकानदार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
या शिक्षकांना कुठल्याही प्रकारची सूट देऊ नये