पंढरपूर, दि ०६ : महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे. मनसेला साथ दिल्यास भविष्यात आपणाला आवश्यक त्या सर्व सुख सुविधा पुरवण्यात येतील अशी ग्वाही मनसे नेते व सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी दिली.
ते पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेना यांच्या वतीने व मनसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेना शाखा पंढरपूर यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे पुणे शहर महिला अध्यक्ष वनिता वागसकर, मनसे शिक्षक शिक्षकेतर सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के, राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, राज्यसचिव विश्वास गजभार, सोलापूर मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सोलापूर लोकसभा मनसे अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, सोलापूर शहराध्यक्ष वीरसंगप्पा भोज, मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लातूर जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, माधव गीते, युवराज जगताप, विनायक शेळके, राज्य शिक्षकेतर प्रमुख गुरु मोराळे, कोल्हापूर विभाग प्रमुख परशुराम घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभीआराध्य दैवत श्री पांडुरंग, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर सहशिक्षिका सुनिता परचंडे यांनी स्वागत गीत सादर केले.
जाहिरात –
मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले, शिक्षक शिक्षिका या बंधू-भगिनींना त्यांच्या शैक्षणिक कार्याचे बाबतीत कोणतीही अडचण येत असेल तर मला जरूर सांगा मी ती अडचण दूर केल्याशिवाय राहणार नाही. आज या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून गुणवंत शिक्षक हे या ठिकाणी आलेले आहेत. या शिक्षकांमध्ये नंदुरबार येथील एक शिक्षिका आदिवासी भागामधून आलेली आहे ती तिचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून आलेल्या शिक्षिका भगिनीने जे मत व्यक्त केले त्या आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की ८० टक्के आदिवासी मुलं हे शिक्षण घेत आहेत आणि अशा दुर्गम भागात असलेल्या या शिक्षका भगिनींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे. मोठ्या पदावर नोकरीची संधी असतानाही सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने आपल्या समोर उभा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वाभिमानाने उभा राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक शिक्षकांनी पालक मीटिंग घेत त्यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता हे एकमेव ध्येय समोर ठेवून वाटचाल केलेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांचा गौरव करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. यावेळी जयवंत हक्के, प्रशांत इंगळे, प्रशांत गिद्दे यांच्याबरोबर पुरस्कार प्राप्त दिनकर मुंडे, प्रा. रेखा चव्हाण, प्रशांत गुरव, प्रशांत वाघमारे त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी भ्रमणध्वनी वरून सर्वांशी संवाद साधत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा ३२ जणांना मनसे नेते व सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप धोत्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून पुरस्कारास पात्र ठरलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.
जाहिरात –
मनसे शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने आयोजित विविध शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके यांनी निवेदन संजय खांडेकर व गीतांजली कोल्हे यांनी केले तर आभार मंगल मुळीक यांनी मांडले. पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी मनसे शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.