मंगळवेढा, दि.०६ : मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सुमारे ७०० कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ उद्या सोमवार दि.०७ रोजी दुपारी ०३ वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-दहिवडी रस्त्यावरील लक्ष्मीदेवी टेकावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात कळीचा व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा ठरलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला १३ मार्च २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे, हे केवळ राजकारणासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशा टीका विरोधकांनी केल्या होत्या मात्र मंजुरीच्या दुसऱ्याच दिवशी टेंडर प्रसिद्ध करत सरकारने विरोधकांना चपराक दिली होती. त्यामुळे काही दिवसातच या योजनेचे काम सुरू होईल असा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागला होता, तो दिवस उजाडला असून प्रत्यक्षात या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला आणि आवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार १३ मार्च २०२४ च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६९७.५१ कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विना अट मंजुरी देत मंगळवेढेकरांना दिलेला शब्द फडणवीस सरकारने पूर्ण केला होता.
मंगळवेढा तालुक्यातून फटाके फोडून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर विरोधकांकडून या अगोदरही अशी मंजुरी मिळाली होती यात नवीन काय? असं म्हणत या मंजुरीची खिल्ली उडवली जात होती मात्र पहिल्या टप्प्यातील १११ कोटीच्या कामाचा शुभारंभ होत असल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी शब्द सुचेनासे झाल्याचे चित्र दिसत आहे.
पहिल्या टप्प्यात पंप हाऊस बांधकाम करणे, उर्ध्वगामी नलिका क्रमांक एकचे काम सुरू करणे, शेलेवाडी येथे वितरण कुंड तयार करणे या कामाचा समावेश आहे त्यामुळे नुसत्या मंजुऱ्या देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा राजकारण्यांनी मांडला आहे असे बोलणाऱ्याना एक प्रकारे चपराक बसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या टीमकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,खासदार प्रणिती शिंदे, आमदार अरुण लाड.आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार यशवंत माने, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार संजय शिंदे, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार बबनदादा शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.
या कामांचा होणार शुभारंभ –
मंगळवेढा उपसा सिंचन योजना (७०० कोटी) पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी बंधारा (३५ कोटी), उपजिल्हा रुग्णालय मंगळवेढा (१०० कोटी) व कर्जाळ – कात्राळ ते नॅशनल हायवे पर्यंतचा रस्ता (२०० कोटी) या विकास कामांचेही उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.