पंढरपूर, दि.४ : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेस २ कोटी २ लाख रुपयाचा नफा झाला असून कर्जाचा व्याजदर ८% असताना सभासदांना १० % लाभांश वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंड यांनी दिली.
पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पुणे विभाग शिक्षकांचे माजी आमदार दत्तात्रय सावंत व पुणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष कल्याणराव बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने पतसंस्थेचा शाखा विस्तार पुणे, मुंबई , बार्शी आणि पंढरपूर या ठिकाणी सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली तसेच कार्यक्षेत्र वाढविण्याबाबत पोट नियम दुरुस्ती करण्यास मंजुरी देणे, सभासदाच्या दोन पाल्यांसाठी शुभमंगल योजना सुरू करणे यामध्ये सभासदांच्या दोन पाल्याच्या लग्नकार्यासाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये देणे. शिवाजीनगर येथील तीन प्लॉट विकासकास देणे, तसेच सोलापूर शहर येथील सिटी सर्वे नंबर ९५२ या जागेची विक्री करण्यास मंजुरी देण्यात आली.
या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेच्या गुणवंत पाल्यांचा मार्च 2024 च्या दहावी व बारावीच्या परीक्षेत 75 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या पाल्यांना दोन हजार रुपये व इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीधारकांना दोन हजार रुपये पारितोषिक म्हणून माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. पारितोषिक स्वीकारण्यासाठी पालक व पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पतसंस्थेचे संचालक तात्यासाहेब काटकर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संजीवनी ठेव योजना – या योजनेतून दुर्दैवाने मयत झालेल्या सभासद वारसांना १० लाख रुपये सहाय्य देण्याची तरतूद माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कल्पनेतून साकारण्यात आली आहे. या निधीतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात मयत सभासद वारसांना एक कोटी आठ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन सुरेश गुंड यांनी दिली. पतसंस्थेची सभासद सेवानिवृत्ती व राजीनामा दिल्याने ४०८ सभासद कमी झाले, मार्च २०२४अखेर ३५२८ इतकी सभासद संख्या आहे. पतसंस्थेचे भाग भांडवल १४ कोटी ३४ लाख रुपये आहे. दीर्घकालीन थकीत वसूलीस प्रतिसाद -कर्जदारांना कायद्याचा बडगा उगारून वसूली करण्यात यश आले आहे. अहवाल सालात थकीत कर्जदारांनी वेळेत हप्ते भरण्यासाठी मुख्याध्यापक, लिपिक व जामीनदार सभासदांनी संस्थेस सहकार्य करण्याचे आवाहन सुरेश गुंड यांनी केले.
सभासदांनी उपस्थित केलेल्या सूचना व शंकांचे निरसन करून उपस्थितांना माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी मार्गदर्शन केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेस पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सुप्रिया विलास पांगळ, संचालक समाधान घाडगे, मारुती गायकवाड, संभाजीराव चव्हाण, शिवाजी थिटे, कैलास देशमुख, दत्तात्रय कदम, शिवाजी शिंदे, तात्यासाहेब काटकर, नामदेव आलदर, विद्या पाटील, नवनाथ मोहोळकर, जवानसिंह रजपूत , सचिव चंद्रकांत भोसले, पंढरीनाथ पवार आदी उपस्थित होते. संस्थेचे लेखापरीक्षक श्री.एस. एस. लंगोटे व संचालक मंडळाने काटकसर व पारदर्शकपणे केलेल्या कारभाराबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेचे सूत्रसंचलन संचालक राजेंद्र माळी यांनी तर आभार संचालक संभाजी चव्हाण यांनी मानले.