मंगळवेढा, दि.०३ : वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते. विचारांची क्षितिजे विस्तारित होतात. व्यक्ती विकास, समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडते म्हणून महावाचन 2024 हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी पंचायत समिती शिक्षण विभाग व स्व. संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय कृष्णनगर मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावाचन 2024 या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले.
या ग्रंथ प्रदर्शनात चरित्र,आत्मचरित्र, प्रवास वर्णन, मराठी इंग्रजी व हिंदी भाषेतील बालसाहित्य, सामान्य ज्ञान विषयक साहित्य,आरोग्य व संदर्भ साहित्य तसेच वृत्तपत्र कात्रण संग्रह व जुनी-नवी देशी परदेशी नाणी आणि पोस्टाच्या तिकिटांच्या संग्रहाचा समावेश करण्यात आला होता. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रतिनिधींचा सत्कार ग्रंथ भेट व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय येडवे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी महावाचन उपक्रमाची गरज, व्याप्ती व स्वरूप यांचे स्पष्टीकरण केले. शिक्षण विस्तार अधिकारी श्याम सरगर यांनी आपल्या मनोगतात वाचन हा संस्कार बालवयातच रुजायला हवा असे सांगत वाचनाने घडलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची चरित्र थोडक्यात सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे यांनी वाचन हे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासात गती व वाढ होते. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडते. त्यांच्या आवडत्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रगती करण्यास संधी मिळते असे प्रतिपादन केले व महाराष्ट्र वाचन चळवळीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी तर आभार केंद्रप्रमुख सुदर्शन शेजाळ यांनी मानले.
कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड, केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण,चंद्रकांत पाटील,विषय तज्ञ शरद पवार,युवराज भंडारे, अमोल कुलकर्णी, कुमार कोकाटे, अतुल रामदासी, संगीता मोरे, उषा पाटील, भीमराव घुले, संकेत सातपुते, ऋषिकेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,सरिता शिंदे, अमित भोरकडे, सुभाष साळस्कर, अरुंधती पोरे, वाचनालयाचे संचालक धर्मराज जाधव व ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. ग्रंथालयास कै. लक्ष्मीबाई दत्तू प्रशाला व दामाजी हायस्कूलचे सर्व विद्यार्थी व तालुक्यातील माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, नगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.