मंगळवेढ्याच्या  शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; संजय जावीर यांच्याकडे शिक्षणाधिकारी तथा शिक्षण निरीक्षकपद

सोलापूर, दि.०३ : जिल्हा परिषद ,प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ( प्रशासन शाखा) मधील शिक्षणाधिकारी तथा शिक्षण निरीक्षकपदी बृहन्मुंबई , पश्चिम विभाग ,मुंबई येथे पदोन्नतीने बदली झाली आहे.

उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची सन २०११ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधून गटशिक्षणाधिकारी/ उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी जत व सांगोला येथे गटशिक्षणाधिकारीपदी काम केले आहे आणि सन २०२० पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याठिकाणी शिक्षणाधिकारीपदाचा पदभारही त्यांनी ११ महिने यशस्वीपणे सांभाळला आहे. सध्या उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) या पदाबरोबर सोलापूर महानगपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचाही कार्यभार आहे.

उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची उपशिक्षणाधिकारी निवड होण्यापूर्वी ते मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल येथे १७ वर्षे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळामध्ये त्यांचा एक आदर्श शिक्षक म्हणून मंगळवेढा तालुक्यात नावलौकिक आहे. त्यांचे वडिल ज्ञानदेव जावीर हे शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद व सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी काम केले आहे आणि आज त्याच पदावर त्यांचे चिरंजीव उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनाही काम करण्याचा योग आला आहे. राज्यात शिक्षणाधिकारी यांचा मुलगा शिक्षणाधिकारी होण्याचा मान मंगळवेढ्यातील पिता पुत्रांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या पदोन्नतीबद्दल आमदार समाधान आवताडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, महापालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले , उपायुक्त तैमूर मुलाणी, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) कादर शेख, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) सचिन जगताप आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here