सोलापूर, दि.25 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसापासून संघर्ष योद्धे मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर यांनी गुरुवार दि.25 रोजी सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली होती परंतु आज मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार उद्याचा सोलापूर बंद मागे घेत असल्याचे सकल मराठा समाजाकडून कळविण्यात आले आहे.
सकल मराठा समाज शहर व जिल्हा सोलापूर यांच्यावतीने असे जाहीर करण्यात आले आहे की, सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, माननीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यामुळे व मनोजदादा यांनी आज केलेल्या आवाहनानुसार उद्या जो आपण त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहर व जिल्हा बंद पुकारला होता तो रद्द करण्यात येत आहे. तरी या बंदच्या निमित्ताने जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी,सर्व समाजघटक , तसेच व्यावसायिक, शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थी व इतर सर्व व्यापारी संघटना यांची जी गैरसोय होणार होती. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत, तसेच उद्याच्या बंद मध्ये सहभाग नोंदवणाऱ्या शहर व जिल्ह्यातील रिक्षा संघटना,विद्यार्थी वाहतूक संघटना, व्यापारी संघटना, शाळा महाविद्यालये, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, खासगी व शासकीय आस्थापना, व सर्व व्यवसायिक संघटना, पोलिस प्रशासन, पत्रकार बांधव यांनी बंदसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत.
प्रकृती खालावत चालली असतानाही संघर्ष योद्धे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरूच होते. त्यामुळे गड तर जिंकुच परंतु पिशिंदा जगला पाहिजे या भूमिकेतून समाजातील सर्वच घटकांकडून मनोज जरांगे-पाटील यांना उपोषण सोडवण्याची विनवणी करण्यात येत होती. या सर्वांचा मान राखत मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.