मंगळवेढा, दि.24 : राज्य महसूल विभागातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवेत सामावून घेण्यात यावे या प्रलंबित मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंत्रालयीन दालनात भेट घेऊन संबंधित मागण्यांचे निवेदन दिले.
महसूल प्रशासतील विविध लोककल्याणकारी योजना आणि गाव-खेड्यातील जनता यांना समन्वयाचे रूपाने बांधून ठेवणारा घटक म्हणजे कोतवाल आहे. गेली अनेक वर्षे प्रशासनाच्या सेवेत इमान-इतबारे आपली कर्तव्य सेवा हाकणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू करून घेणे ही त्यांच्या शाश्वत भविष्य निर्मितीची नांदी होईल असे आमदार समाधान आवताडे यांनी मागणीमध्ये म्हटले आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ देऊन राज्य महसूल विभागातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात सखोल चर्चा करत लवकरात-लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार आवताडे यांनी आभार मानले.
यावेळी नाशिक विधानसभा लोकप्रतिनिधी आमदार सरोज अहिरे व इतर लोकप्रतिनिधी तसेच मंगळवेढा येथील जेष्ठ पत्रकार अबुबकर सुतार आणि संबंधित प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते..