मंगळवेढा, दि.22 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रथम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून पहिल्या पाच उमेदवारामध्ये पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत असणारे दिलीप धोत्रे यांना पसंती देण्यात आली आहे. आता आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या मिळून सोडवू अशी ग्वाही मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून मंगळवेढा येथे मंगळवेढा केसरी 2024 चे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती आखाड्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मनसे तालुका प्रमुख नारायण गोवे, जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत पवार, कोल्हापूरचे पवन महाडिक, दादा धोत्रे, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, मंगळवेढा तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष दामोदर घुले, कुस्ती आखाडा प्रमुख मारुती वाकडे, महेंद्र देवकते, मुरलीधर सरकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मनसे केसरी 2024 साठी महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे आशिष हुड्डा यांच्यात झाली. दहा मिनिटे चाललेल्या या कुस्तीत पैलवान गायकवाड यांनी सुरुवातीपासुन वर्चस्व प्रस्थापित केले होते. शेवटी घुटना डावावर महेंद्र गायकवाड यांनी आशिष हुड्डा यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करीत कुस्ती जिंकली. या कुस्तीचे पंच म्हणून 1988 चे महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टी यांनी काम पाहिले. मनसे केसरी 2024 चे विजेते पैलवान महेंद्र गायकवाड यांना मानाची गदा व पाच लाख रुपये रोख रकमेचे पारितोषिक मनसे नेते अमित ठाकरे, संयोजक दिलीप धोत्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे यांचा सत्कार विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन करण्यात आला.
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, पैलवान आपल्या ताकदीचा वापर कुस्तीत करतात. त्यांचा हात हलका असला तरी तो खूपच भारी असतो हे आम्ही जाणून आहोत. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी या कुस्ती स्पर्धेचे खूप खूप चांगले नियोजन केले आहे. या नियोजनाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. आपल्या आमच्याकडुन खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असो की इतर घटकांचे प्रश्न ते सारे प्रश्न आम्ही एकत्रितपणे निश्चितच सोडवू.
मनसे केसरी 2024 चे संयोजक दिलीप धोत्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक बेरोजगार युवक, महिला भगिनी यांच्या हाताला काम देणे हे माझे कर्तव्य समजतो. येत्या आठवडाभारत नोकरी महोत्सव घेऊन प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनसे केसरी 2024 या कुस्ती आखाड्यात स्थानिक मल्लापासून राष्ट्रीय मल्लांनी कुस्तीचा खेळ दाखवीत कुस्ती शौकैनांची मने जिंकली. कुस्ती पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते. धनाजी मदने व अशोकधोत्रे यांनी निवेदन करीत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अर्जुन अवॉर्ड विजेते , हिंद केसरी, रूस्तम-ए-हिंद. महासम्राट, कुस्ती सम्राट, भारत भीम, तसेच महाराष्ट्र केसरी, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त, ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन, राष्टकुल सुवर्ण पद विजेते, तसेच राज्याच्या विविध भागातील पैलवान यांनीही उपस्थित राहून कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूना प्रोत्साहन दिले.