मंगळवेढा, दि.22 : सकल धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर येथे गेल्या 14 दिवसापासून आंदोलन सुरू असून या धनगर समाज बांधवांच्या आरक्षण मागणीस आपला व आपल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी लेखी पत्र देत जाहीर केले आहे.
पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांनी आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले असून आंदोलनाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शंभूराजे देसाई व शिष्टमंडळ यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे यांनी आंदोलनकर्त्यांची धनगर आरक्षण आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात भेट घेतली होती. आता सकल धनगर बांधवांना आरक्षणाची ST (अनुसूचित जाती-जमाती) प्रवर्गात अंमलबजावणी करावी म्हणून, सकल धनगर समाज बांधव जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे आले असता त्यांच्या निवेदनास अनुसरून लगेच आमदार समाधान आवताडे लिखित स्वरूपात त्यांना पत्र देऊन पाठिंबा दर्शवला. यावेळी धनगर बांधवांच्या मागण्या सर्व मागण्या शासन दरबारी मांडून योग्य तो तोडगा काढण्याचं लेखी आश्वासन सकल धनगर बांधवांना दिले.यावेळी मोठ्या प्रमाणात धनगर बांधव उपस्थित होते. समाज उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या झेप संवाद न्यूज या न्यूज पोर्टलवर आपण ही बातमी वाचत आहात.
त्यांनी या लिखित स्वरूपात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाला विमुक्त संवर्गातून (NT) या प्रवर्गातून आरक्षण दिले जाते. राज्यामध्ये धनगर जमात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ चा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत. १९५६ च्या एस.सि / एस.टी यादीत महाराष्ट्रातील अनु.क्र.३६ वर ‘धनगड’ आल्याने धनगर जमात त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित असून गेली ६८ वर्ष वंचित आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड हे अस्तित्वातच नसून धनगड हे धनगरच आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) मधील असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हि बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे यासाठी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी देखील वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे मान्य केलेले होते त्याप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे आहे.
तरी महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आश्वासन दिल्यानुसार धनगर समाजाला अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातून असलेले आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे उपोषणास बसलेल्या माझ्या बांधवास माझा तसेच आमच्या सर्व कार्यकर्ते यांच्यावतीने जाहीर पाठींबा देत आहे.