मनसे कहो दिलसे ; मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे मंगळवेढा येथे येणार

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा उपक्रम : मनसे केसरी 2024 चे ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन 

मंगळवेढा, दि.18 : मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली रविवार दि. 22 रोजी दुपारी तीन वाजता मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणाऱ्या मनसे केसरी 2024 या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे उद्घाटन मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मनसे कहो दिलसेचा नारा पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात घुमणार आहे.

मनसे केसरी 2024 मध्ये पाच लाख रुपये बक्षीसासाठी दोन कुस्त्या होणार असून या महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे आशिष हुड्डा यांच्यात तसेच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व दिल्लीचा पैलवान दीपक कुमार यांच्यात रंगणार आहे. दोन लाख रुपये बक्षीसासाठी माऊली जमदाडे व रोहित दलाल, एक लाख रुपये बक्षीसासाठी उमेश चव्हाण व संग्राम साळुंखे, तात्या जुमाळे व विजय शिंदे, पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीसासाठी ज्योतिबा आटकळे व संग्राम अस्वले, तर पन्नास हजार रुपये बक्षीसासाठी सौरभ घोडके व सुनील हिप्परकर यांच्यात कुस्त्या होणार आहेत.

या मैदानात प्रणित भोसले व सागर चौगुले, समाधान कोळी व सुमित आसवे, बालाजी मळगे व समर्थ काळे, विजय धोत्रे व अजय नागणे, कामण्णा धुमुकनाथ व राजेंद्र नाईकनवरे, दिग्वीजय वाकडे व अमर मळगे, सुनिल हिप्परकर व सौरभ घोडके, रणजित घोडके व शंकर गावडे, यश धोत्रे व शंतुनु शिंदे यांच्याही कुस्त्यांचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. यावेळी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक मल्लांच्याही कुस्त्या होणार असून त्यांनाही लाखो रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

आखाडा प्रमुख मारुती वाकडे हे या मनसे केसरी 2024 च्या निमित्ताने म्हणाले की, पैलवान हा कोणत्याही पक्षाचा नसतो, त्याला जो आपले समजून प्रेम देतो तो त्याच्या बाजूने नेहमीच खंबीरपणे उभा राहतो. मंगळवेढा हे कुस्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या संतभूमीतून अनेक कुस्तीपटू घडले. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी मनसे केसरी 2024 होत आहे त्यास कुस्ती शौकिनांची मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

मंगळवेढा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष दामोदर घुले यांनी मनसे केसरी 2024 बाबत सांगितले की, मंगळवेढा तालुक्याला पैलवानांचा वारसा लाभलेला असून वारसा सांभाळण्याचे काम आता मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून होत आहे. शून्यातून विश्व निर्माण करत असताना दिलीप धोत्रे यांनी विविध समाजपयोगी कार्यक्रमात नेहमीच हात पुढे केला आहे. आता अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे जात असलेल्या कुस्तीपटूंना या स्पर्धेच्या निमित्ताने प्रोत्साहन देण्याचे काम या मनसे केसरी 2024 च्या माध्यमातून होत आहे.

आखाडा प्रमुख म्हणून मारुती वाकडे, दामोदर घुले, भिमान्ना माळी, सोमनाथ सुर्वे, महेंद्र देवकते हे काम पाहणार असून अधिक माहितीसाठी पैलवान धोत्रे (पंढरपूर ) भ्रमणध्वनी क्रमांक 8668293908 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here