मंगळवेढा, दि.16 : मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मनसे केसरी 2024 या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हा आखाडा रविवार दि. 22 रोजी दुपारी तीन वाजता मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर रंगणार आहे. या आखाड्यातील कुस्तीपटूंना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तर सकाळी दहा ते दोन यावेळेत स्थानिक मल्लांची कुस्ती स्पर्धा घेऊन त्यांनाही रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
मनसे केसरी 2024 च्या आयोजनाबाबत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मंगळवेढा येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, आखाडा प्रमुख मारुती वाकडे, मंगळवेढा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष दामोदर घुले, मनसे तालुकाध्यक्ष नारायण गोवे, जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत पवार, मुरलीधर सरकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी यावेळी सांगितले की, ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपल्या हक्काचे मैदान मिळावे यासाठी या मनसे केसरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून मी वाटचाल करत इथेपर्यंत पोहोचलेलो आहे. सामाजिक ऋण फेडण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करीत आहे. यंदा मंगळवेढा येथे होणारी मनसे केसरी 2024 हा सुद्धा एक सामाजिक बांधिलकीचाच भाग आहे. मंगळवेढा येथील मनसे केसरी या स्पर्धा जीवात जीवमान असेपर्यंत घेण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनसे केसरी 2024 मध्ये पाच लाख रुपये बक्षीसासाठी दोन कुस्त्या होणार असून या महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे आशिष हुड्डा यांच्यात तसेच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व दिल्लीचा पैलवान दीपक कुमार यांच्यात रंगणार आहे. दोन लाख रुपये बक्षीसासाठी माऊली जमदाडे व रोहित दलाल, एक लाख रुपये बक्षीसासाठी उमेश चव्हाण व संग्राम साळुंखे, तात्या जुमाळे व विजय शिंदे, पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीसासाठी ज्योतिबा आटकळे व संग्राम अस्वले, तर पन्नास हजार रुपये बक्षीसासाठी सौरभ घोडके व सुनील हिप्परकर यांच्यात कुस्त्या होणार आहेत.
या मैदानात प्रणित भोसले व सागर चौगुले, समाधान कोळी व सुमित आसवे, बालाजी मळगे व समर्थ काळे, विजय धोत्रे व अजय नागणे, कामण्णा धुमुकनाथ व राजेंद्र नाईकनवरे, दिग्वीजय वाकडे व अमर मळगे, सुनिल हिप्परकर व सौरभ घोडके, रणजित घोडके व शंकर गावडे, यश धोत्रे व शंतुनु शिंदे यांच्याही कुस्त्यांचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अर्जुन अवॉर्ड विजेते , हिंद केसरी, रूस्तम-ए-हिंद. महा सम्राट, कुस्ती सम्राट, भारत भीम, तसेच महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन, राष्टकुल सुवर्णपद विजेते, तसेच कुस्ती शौकीन, राज्याच्या विविध भागातील पैलवान हे उपस्थित राहून कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूना प्रोत्साहन देणार आहेत.
तर मोठे रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब मगर, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, कुस्ती सम्राट अस्लम काझी, माजी नगराध्यक्ष वामन (तात्या) बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आखाडा प्रमुख म्हणून मारुती वाकडे, दामोदर घुले, भिमान्ना माळी, सोमनाथ सुर्वे, महेंद्र देवकते हे काम पाहणार असून अधिक माहितीसाठी पैलवान धोत्रे (पंढरपूर ) भ्रमणध्वनी क्रमांक 8668293908 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.