पुणे, दि.19: महाराष्ट्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी स्वतंत्र शासकीय आदेशाआभावी वरिष्ठ वेतनश्रेणी पासून वंचित असून या कर्मचाऱ्यांना आता वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणेबाबत आवश्यक शासकीय आदेशाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शालेय शिक्षण विभाग, शासनाच्या इतर सर्व विभागातील कर्मचारी तसेच माध्यमिक, प्राथमिक आश्रमशाळा तेथील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळत असताना उच्च माध्यमिक आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळत नसल्याने सारे खाशी तुपाशी मग आम्हीच काहो उपाशी असा प्रश्न कर्मचारी वर्गाकडून विचारला जात आहे.
महाराष्ट्र राज्यात समाजकल्याण विभागाच्या वतीने दि.26जून 2008 च्या शासन निर्णयाद्वारे माध्यमिक आश्रम शाळांना श्रेणीवाढ देऊन त्यांना 148 कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. विमुक्त जाती, भटके जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या शैक्षणिक विकासाची असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची 2017 साली निर्मिती करून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा या विभागाकडे वर्ग करण्यात आल्या. गेली 16 वर्षे या कनिष्ठ महाविद्यालयातून शैक्षणिक प्रवाहापासून दूर जाऊ पाहणाऱ्या विविध जाती-जमातीच्या मुलांना ज्ञानार्जन करण्याचे काम होत आहे. राज्यात या कनिष्ठ महाविद्यालयात 11840 निवासी विद्यार्थी तर तीस हजारांहून अधिक अनिवासी स्वरूपात शिक्षण घेत आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयात 1170 शिक्षक तर 289 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शालेय शिक्षण विभाग, शासनाच्या इतर सर्व विभागातील कर्मचारी तसेच प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवेची 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळतो परंतु उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शासन आदेश नसल्याने हे कर्मचारी वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित आहेत.
उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आजपर्यंत आपल्या हक्कासाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागला आहे. नियमित वेतन, वेतन फरक, सातवा वेतन आयोग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी, सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून वेतन आदी बाबीसाठी प्रसंगी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले लागले आहेत. आता वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्याबाबत करण्यात येणारे प्रस्तावही शासननिर्णयाआभावी फेटाळले जात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना वरिष्ठ वेतनश्रेणी ताबडतोब लागू करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून प्रयत्न
– इतर बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रयत्न सुरू असून विद्यार्थ्यांना प्रेरित आणि प्रफुल्लित करण्यासाठी भविष्य शिक्षण, बौद्धिक विकासासाठी रोबोटिक्स ए आय आणि कोडींग लॅब तसेच विद्यार्थी निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारचे खेळाचे साहित्य तसेच गरम पाण्यासाठी सोलर यंत्रणा शासनाकडून पुरवण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. सतत कोणत्याना कोणत्या हक्कासाठी लढणाऱ्या आश्रम शाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सदैव प्रयत्न राहतील.
वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याने विद्यार्थी व पालक वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. स्वराज्य शिक्षक संघाकडून मंत्री अतुल सावे यांचा अभिनंदनाचा ठराव करून त्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
– फत्तेसिंह पवार, अध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य
आकडे बोलतात-
-उच्च माध्यमिक आश्रम शाळा-148
-निवासी विद्यार्थी संख्या-11840
-अनिवासी विद्यार्थी संख्या- 30 हजाराहून अधिक
-शिक्षक-1170
-शिक्षकेतर कर्मचारी-289