श्रीकांत मेलगे / ब्युरो चीफ- झेप संवाद न्यूज
सोलापूर, दि.११ : गेल्या १९ वर्षापासून वेळोवेळी शासकीय कर्मचाऱ्याकडून जुन्या पेन्शनची मागणी होत असताना शासनाकडून मात्र डोळे झाक केली जात आहे. आम्हाला दुसरे काही नको, फक्त आम्हाला जुनी पेन्शन द्या अशी मागणी करत करमाळा (जि.सोलापूर) येथील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाप्रमुख अरुण चौगुले व पेन्शन फायटर रेणुका चौगुले यांनी गौराईच्या देखाव्यातून जुन्या पेन्शनची मागणी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
महाराष्ट्रात श्रीगणेशाचे स्वागत मोठ्या थाटात करण्यात आले असून कालपासून सोनपावलांनी गौराई सुद्धा घराघरात दाखल झाल्या आहेत. मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत करून त्यांचे देखावे उभारले जातात. हे देखावे उभा करत असताना सजावट किती आकर्षक होईल याकडे लक्ष दिले जातात परंतु या साऱ्या गोष्टीला छेद देत गौरी गणपतीच्या देखाव्यातून करमाळा येथील पेन्शन फायटर अरुण चौगुले यांनी जुन्या पेन्शनची मागणी लावून धरली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना अरुण चौगुले व त्यांच्या पत्नी पेन्शन फायटर रेणुका चौगुले ह्या वेळोवेळी झालेल्या पेन्शन लढ्यात सहभागी झालेले आहेत. आता या चौगुले कुटुंबाने गौरी गणपतीच्या देखाव्यातून जुनी पेन्शन ची मागणी करत शासनाचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
उठ बांधवा जागा हो, पेन्शन लढ्याचा तू धागा हो,
नो एनपीएस, नो जीपीएस, नो युपीएस, वुई वॉन्ट- ओन्ली यूपीएस
आता बास झालं..जो पेन्शन की बात करेगा,
वो देश पर राज करेगा…वुई वॉन्ट- ओन्ली यूपीएस
बाप्पा, तू तर पावलास ; सरकार कधी पावणार
असे जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत फलक लेखन करून शासनकर्त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच गौरी गणपतीच्या देखाव्यातून त्यांनी महाराष्ट्राचे जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी संत साई भूमी शिर्डी येथे होणाऱ्या राज्य महाअधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे काम पेन्शन फायटर कडून होत असताना आता सर्वांनाच शिर्डी येथे होणाऱ्या महाअधिवेशनास उपस्थित राहण्याची गरज आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आपल्या संघटनेद्वारा होत असलेल्या विविध आंदोलने, मोर्चे, संपाचा आता आणखीन टप्पा आलेला आहे. या संघर्षातून आपण आत्तापर्यंत कुटूंब निवृत्ती वेतन, सेवा उपदान, रुग्णता वेतन, अनुकंपा लाभ, असे विविध लाभ पदरात पाडून घेतले आहेत. आपल्या देशात राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड अशा राज्यातील कर्मचाऱ्यांनी आपला हक्क म्हणजेच जुनी पेन्शन जशीच्या तशी पदरात पाडून घेतली आहे. मग महाराष्ट्रातील कर्मचारीच मागे का आहेत? चला तर मग… संत साईभूमी शिर्डीला अन जुन्या पेन्शन योजनेची व्याप्ती किती खोल आहे हे दाखविण्यासाठी लाखोंच्या संख्येने राज्य महाधिवेशनात उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून करण्यात आलेले असताना जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत करमाळा येथील पेन्शन फायटर चौगुले कुटुंब यांनी गौरी गणपतीच्या देखाव्यातून उभारलेला पेन्शन लढा निश्चितच महाराष्ट्रातील साऱ्या पेन्शन फायटरसाठी उर्जितावस्था आणणारा ठरत आहे.
पहा व्हिडिओ —-