मंगळवेढा, दि.10 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाजातील वंचित घटकासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजना तळागाळातील लोकापर्यंत पोहोचल्या तरच त्यांची प्रगती होणार असल्याने वंचित घटकापर्यंत योजना पोहोचण्यासाठी सर्वांनी संदेश वाहकाचे काम करावे असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण सोलापूरच्या सहायक संचालिका मनिषा फुले यांनी केले.
त्या मंगळवेढा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग-महाराष्ट्र राज्य व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, सोलापूर यांच्यावतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा संयुक्त तालुकास्तरीय मेळाव्यात बोलत होत्या. विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरीता महाराष्ट्र शासन यांचेकडून दिल्या जाणाऱ्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विशेष मेळावे आयोजित करण्यात आले होते. मेळाव्याचा सांगता समारंभ पंढरपूर-मंगळवेढा संयुक्त तालुकास्तरीय मेळाव्याने मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार हरिदास चांडोले, मंगळवेढाचे गटशिक्षणाधिकारी बिभिषण रणदिवे, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, नगरपालिका प्रशासन अधिकारी सचिन मिसाळ, अर्चना जनबंधू, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे तसेच मंगळवेढा – पंढरपूर तालुक्यातील सर्व आश्रमशाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन थोर महात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबवल्या जात असल्याचे नमूद करून संचालिका मनिषा फुले पुढे म्हणाल्या की, राबविल्या जात असलेल्या योजना ज्यांच्यासाठी हा विभाग काम करीत आहे त्या घटकापर्यंत या योजना पोहोचत नाहीत. या महत्त्वाच्या योजनांची माहिती आपणा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्याची खूप मोठी जबाबदारी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची आहे. समाज स्थिर होत नाही तोपर्यंत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचणार नाहीत त्यामुळे या समाजाला स्थिर करण्यासाठी त्यांच्या पाल्यांना शिक्षण आणि संरक्षण देण्यासाठी आश्रमशाळा कार्यान्वित असून या माध्यमातून लाखो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मार्फत राबवल्या जात असलेल्या आश्रमशाळा, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व वैयक्तिक घरकुल योजना यासह विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना गटशिक्षणाधिकारी डॉ बिभीषण रणदिवे म्हणाले की, सामाजिक न्यायासाठी झटत असताना व्यवस्थेने ज्यांचे पाय बांधले आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम तुम्हाला सर्वांना करावयाचे आहे. समाजातील सर्व घटक गुण्यागोविंदाने व आनंदाने कसा राहील यासाठी शासनाकडून विविध तरतुदी करण्यात येतात. अन्नासाठी भटकंती करणाऱ्या विमुक्त भटक्या जाती जमातीच्या लोकांनी या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. यावेळी कार्यक्रमाचे हरिदास चांडोले, विजय पिसे, चंद्रकांत हेडगिरे, वेदांत वाले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
पंढरपूर-मंगळवेढा संयुक्त तालुकास्तरीय मेळाव्याचे निवेदन विक्रम बिस्किटे यांनी तर आभार प्राचार्य राजेंद्र पोतदार यांनी मांडले. मेळावा यशस्वी करण्यासाठी आश्रमशाळांचे प्राचार्य राजेंद्र पोतदार, गणपती पवार, राजाराम दत्तू, गुरुदेव स्वामी, संजय मोरे, मुख्याध्यापक सुनील साळे, विलास पवार, प्रकाश माळी, गोरखनाथ भोसले, विठ्ठल कारंडे तसेच शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले.