उत्कर्ष बहुजनांचा, संकल्प बहुजन कल्याणाचा ; मंगळवेढा येथे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मेळावा

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचा उपक्रम : सहायक संचालक मनिषा फुले यांची माहिती 

मंगळवेढा, दि.०८ : उत्कर्ष बहुजनांचा, संकल्प बहुजन कल्याणाचा हा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, सोलापूर यांच्यावतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सोमवार दि.०९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर-मंगळवेढा संयुक्त तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सोलापूरच्या सहायक संचालक मनिषा फुले यांनी दिली.

मंगळवेढा येथील रॉयल फंक्शन हॉल, जुना टोल नाका, बायपास रोड येथे हा मेळावा होणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरीता महाराष्ट्र शासन यांचेकडून दिल्या जाणाऱ्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हा पंढरपूर-मंगळवेढा संयुक्त तालुकास्तरीय मेळावा होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समाधान आवताडे हे असणार आहेत. यावेळी व्यासपीठावर मंगळवेढा प्रांताधिकारी श्री. बी. आर. माळी, मंगळवेढाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार मदन जाधव, पंढरपूरचे गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मंगळवेढाचे गटविकास अधिकारी योगेश कदम, मंगळवेढाचे गटशिक्षणाधिकारी बिभिषण रणदिवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा संयुक्त तालुकास्तरीय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा आश्रमशाळा येथील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here